माणसाचे वागणे हे त्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असते. अब्राहम मास्लो यांनी सिद्धांत मांडला की, या गरजांची उतरंड असते. माणूस सर्व प्रथम शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी काम करतो. अन्न, वस्त्र, कामवासना या शारीरिक गरजा उतरंडीच्या तळाला असतात. आज खायला मिळाले तसे  उद्यादेखील मिळावे यासाठी तो काम करतो. दुसऱ्या पायरीवर सुरक्षितता ही गरज असते. मास्लोच्या मतानुसार या गरजांसाठी काम करणारी माणसे सर्वाधिक असतात. या गरजा पूर्ण झाल्या की त्यावरील गरजा जाणवल्या तरच माणसे काम करायला प्रवृत्त होतात. सुरक्षितता ही गरज पूर्ण झाली की, सामाजिक गरज पूर्ण करण्यासाठी माणूस काम करतो. कुटुंब, मित्रमंडळी, सामाजिक संस्था यांमध्ये आपले स्थान निर्माण करण्यासाठी, संघभावना म्हणून माणसे कार्यरत होतात. यानंतरची गरज म्हणजे स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणे, सामाजिक, आर्थिक प्रतिष्ठा (स्टेटस) जपणे ही असते. इतर माणसांनी आपला आदर करावा, मान द्यावा असे माणसांना वाटत असते. प्रसिद्धी, कीर्ती, सत्ता यासाठी माणसे मेहनत घेतात, त्यावेळी या पातळीवर असतात. याला ‘एस्टीम नीड’ म्हणतात. यानंतरच्या पायरीला मास्लो यांनी ‘सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन’ हा शब्द वापरला आहे. ते म्हणतात की, माणसातील कौशल्ये पूर्णत: व्यक्त होणे म्हणजे सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशन! फार थोडी माणसे या पातळीवर पोहोचतात. यांना कामाची आंतरिक प्रेरणा असते. सत्ता, संपत्ती, मानमरातब अशा बाह्य प्रेरणा त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नसतात. स्वत:च्या क्षमतांचा परमोच्च विकास हीच गरज त्यांना सक्रिय ठेवते. आइनस्टाइन, एडिसन हे या प्रेरणेने काम करत होते.

मास्लो यांनी हा सिद्धांत ‘मोटिव्हेशन अ‍ॅण्ड पर्सनॅलिटी’ (१९५४) या पुस्तकात मांडला. त्यांनीच १९७१ मध्ये, साक्षात्कार (रिअलायझेशन) ही सेल्फ अ‍ॅक्च्युअलायझेशनच्या नंतरची प्रेरणा आहे असे मांडले. ‘स्व’च्या सीमा ओलांडून माणसे उन्नत अवस्था अनुभवण्यासाठी मेहनत घेतात, त्यावेळी ते या पातळीवर असतात. मास्लो यांचा सिद्धांत लोकप्रिय झाला, तसेच त्यावर अनेकांनी आक्षेपही घेतले आहेत. मेंदू संशोधकांनी अशी उतरंड अमान्य केली आहे. तरी स्वत:च्या प्रेरणा नक्की कोणत्या आहेत, हा विचार करणे आवश्यक आहे; कारण त्यामुळे आयुष्याला अर्थ लाभतो.

Essay on My Favourite Teacher goes viral
VIRAL: ६ वीतल्या विद्यार्थ्याचा निबंध वाचून शिक्षक कोमात; भूमिका मॅडमसाठी लिहिलेला निबंध होतोय तुफान व्हायरल
Caste end thought of Babasaheb Ambedkar and Mahatma Jyotiba Phule
फुले-आंबेडकरांचा जाती-अंत विचार
जागतिकीकरणाचा परिणाम
स्वयंप्रेरणा महत्त्वाची!

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com