संमोहित झाल्यानंतर जी स्थिती असते, किंवा जिला इंग्रजीत ‘ट्रान्स’ म्हणतात, तशी मनाची भारित स्थिती अन्य वेळीदेखील येऊ शकते. आपल्या जागृत स्थितीत मेंदू परिसराची माहिती पंचेंद्रियांनी घेत असतो. मात्र त्यातील एकाच गोष्टीवर म्हणजे आवाज, दृश्य, कल्पनाचित्र किंवा शब्द यावर मन पुन्हापुन्हा एकाग्र केले की अन्य गोष्टींचे भान हरपते. यालाच काही जण ‘ध्यान लागणे’ असे समजतात. या अवस्थेत अन्य विचार थांबलेले असल्याने ही मनाची स्थिती आरामदायी आणि सुखद असू शकते. एकाग्रता ध्यानाचा हा परमोच्च क्षण असू शकतो.रासायनिक घटकांचा परिणाम म्हणूनदेखील अशी स्थिती सहजतेने येते. अल्कोहोल, कोकेन, मॉर्फिन अशा विविध रसायनांचा वेगवेगळ्या पद्धतीने मेंदूवर परिणाम होत असला तरी बदललेली अवधान स्थिती हीच यांचे व्यसन लावायला कारणीभूत असते.

एखाद्या कृतीमध्ये तल्लीन झाल्यानंतरदेखील मनाची अशी आनंददायी स्थिती येऊ शकते. या स्थितीला आधुनिक मानसशास्त्रात ‘फ्लो’ असे म्हटले जाते. वारकरी भक्तिभावाने भजनात गुंग झाले की हीच स्थिती अनुभवत असतात. कोणताही खेळ खेळताना खेळाडू त्यामध्ये पूर्ण एकाग्र झाला की याच स्थितीत असू शकतो. त्या स्थितीला ‘बीइंग इन दि झोन’ म्हणतात. त्या वेळी योग्य कृती सहजतेने, मुद्दाम कोणताही विचार न करता घडून येते म्हणूनच या स्थितीला फ्लो असे म्हणतात. गायिका, नर्तकी ‘पीक परफॉर्मन्स’ देत असते त्या वेळी याच स्थितीत असते.

दारू चढल्यानंतर येणारी मनाची स्थिती आणि खेळताना, गाताना, ध्यानावस्थेत किंवा संमोहित स्थितीत असणारी मनाची स्थिती यांमध्ये फरक असला, तरी या साऱ्या स्थितींमध्ये मेंदूत एक साम्य दिसून येते. ते म्हणजे विचारात असताना मेंदूचा सक्रिय असणारा भाग हा या वेळी शांत झालेला असतो किंवा त्याचा मेंदूच्या अन्य भागांशी असलेला संबंध तुटलेला असतो. या भागाला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’ असे नाव दिले आहे. मेंदूचा हा भाग सक्रिय असतो त्या वेळी मनात भूतकाळातील किंवा भविष्याचे उलटसुलट विचार येत असतात. त्यांच्यामुळे चिंता, उदासी, अपराधीभाव, भीती अशा भावना मनाला घेरून टाकत असतात. वरील सर्व स्थितींत मेंदूचा ‘डिफॉल्ट मोड नेटवर्क’ शांत होत असल्याने माणसाला शांत वाटते.

– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com