आपले मन घरासारखे आहे. त्यातील बाहेरची खोली म्हणजे जागरूक मन आणि आतील खोली म्हणजे सुप्त मन. या सुप्त मनातील कचरा स्वच्छ करण्यासाठी मनात येणाऱ्या विचारांकडे आणि शरीरातील संवेदनांकडे साक्षीभाव ठेवून पाहणे आवश्यक असते. असे करणे म्हणजे कचरा शोधून तो साफ करण्यासारखे आहे.

घरात कचरा खूप साठला असेल आणि दुर्गंधी येत असेल तर तो साफ करताना आपण मुद्दाम सुगंध निर्माण करण्यासाठी अगरबत्ती लावतो, रूम फ्रेशनर मारतो. शरीराला येणाऱ्या घामाचा वास कमी करण्यासाठीदेखील परफ्यूम मारतो. तसेच मनाच्या आरोग्यासाठी कर्ताभाव ठेवून समाधान, प्रेम, भक्ती, कृतज्ञता, क्षमा यांसारखे सुखद भाव मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. सर्व उपासना पद्धतीमधील प्रार्थना यासाठीच आहेत. दुर्दैवाने आरत्या मोठ्ठय़ा आवाजात म्हटल्या जातात. प्रेम,आर्तभक्ती या भावना मनात धारण करणे आवश्यक आहे हे लक्षात घेतले जात नाही.

सकारात्मक भावनांप्रमाणेच स्वतला प्रेरणा देणारे, आत्मविश्वास वाढवणारे सकारात्मक विचार मनात काही वेळ धरून ठेवणे आवश्यक असते. मी निरोगी आहे, मला आत्मविश्वास आहे अशा स्वयंसूचना घेणे उपयुक्त असते. पण असे तंत्र शिकवणारे मनात येणाऱ्या नकारात्मक विचारांचे काय करायचे हे योग्य प्रकारे सांगत नाहीत. ‘सकारात्मक विचार धारण करायचे कारण मनातील विचार प्रत्यक्षात येतात,’ असे ‘सीक्रेट’ सांगितले जाते.. मनातील विचार खरे होत असतील, तर आजार वा अपघातांचे तथाकथित नकारात्मक विचारही खरे होतील ही भीती अनेकांना वाटू लागते.

यावर उपाय म्हणजे तथाकथित नकारात्मक विचार आणि अस्वस्थ करणाऱ्या भावना मनात येणे नैसर्गिक असते हे समजून घेऊन त्याकडे साक्षीभाव ठेवून पाहण्याचे कौशल्य विकसित करणे आवश्यक आहे. ही मनाची अंघोळ आहे. कर्त्यां भावाने सकारात्मक विचार आणि भावना मनात काही काळ धरून ठेवणे याचा उपयोग परफ्यूमसारखा आहे. तो अंघोळीला पर्याय होऊ शकत नाही. रोज शरीराची स्वच्छता न करता फक्त परफ्यूम मारत राहिले, की जसे त्वचेचे आजार होऊ लागतात, तसेच सध्या मनाविषयी होऊ लागले आहे. ते टाळण्यासाठी मनात येणाऱ्या  विचारांकडे पाहण्याचा साक्षीभाव आणि विचार करण्याचा कर्ताभाव यांचा समतोल आवश्यक आहे. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com