05 April 2020

News Flash

दीर्घ श्वसन : शिथिलीकरण तंत्र

भाषण करण्यापूर्वी किंवा परीक्षा हॉलमध्ये तणाव येत असेल तर तो लगेच कमी करणे आवश्यक असते.

मानसिक तणावाचा परिणाम म्हणून युद्धस्थिती निर्माण करणारी रसायने शरीरात पाझरतात आणि शरीरात अनेक बदल घडवतात. रक्तदाब, हृदयगती, श्वासगती वाढते. स्नायू ताठर होतात, पाचकस्राव कमी होतात. मात्र यातील केवळ श्वासगती आणि स्नायूंची ताठरता हे दोन बदल जागृत मनाने आपण रिव्हर्स करू शकतो. जैविक मेंदूच्या नियंत्रण असणाऱ्या अन्य साऱ्या क्रिया या आपण जागृत मनाने बदलू शकत नाही.

मी अनावश्यक तणावात आहे, हा तणाव दुष्परिणाम करीत आहे याचे भान आल्यावर आपण श्वासगती जाणीवपूर्वक संथ केली, दीर्घ श्वसन सुरू केले की तणाव कमी होऊ लागतो, त्यामुळे होणारे शरीरातील अन्य बदलदेखील रिव्हर्स होऊन शरीर मन शांतता स्थितीत येते. मनात अस्वस्थता आली की श्वासगती आपल्या नकळत वाढते. नेहमी आपले एका मिनिटात सरासरी सतरा, अठरा श्वास होतात. तणाव आला की त्यांची संख्या वाढते. श्वास भराभर आणि उथळ होऊ लागतात. शरीराला अधिक प्राणवायू मिळावा यासाठी हा बदल होतो. त्यासोबत छातीत धडधड वाढते, भीती वाटू लागते. अशा वेळी ही भीती कमी करण्यासाठी आपण जाणीवपूर्वक आपली श्वासगती संथ करू शकतो. त्याचमुळे श्वासाला सुप्तमनाचा सेतू म्हणतात. जागृत आणि सुप्त मन अशा दोन्हीचे त्यावर नियंत्रण असते.

भाषण करण्यापूर्वी किंवा परीक्षा हॉलमध्ये तणाव येत असेल तर तो लगेच कमी करणे आवश्यक असते. अन्यथा स्मरणशक्ती दगा देते, हातपाय कापू लागतात. अशा वेळी जाणीवपूर्वक सावकाश पोट फुगवत श्वास घ्यायचा आणि संथ गतीने सोडायचा. तो सोडताना संथ सोडला जावा यासाठी तोंडाने शीळ घालताना ओठ करतो तसे ओठ करून सोडायचा, चार सेकंद श्वास घेतला आणि सहा सेकंद तो सोडत राहिलो की एका मिनिटात सहा श्वास होतात. असे करताना आत किंवा बाहेर कुठेच श्वास रोखायचा नाही. श्वास रोखणे म्हणजे कुंभक, तसे केले की तो प्राणायाम झाला. तो कधी करायचा नाही याचे काही नियम आहेत. दीर्घ श्वसनाला अशी कोणतीही बंधने नाहीत.

श्वासगती आणि हृदयगती नेहमी एकमेकांना जोडलेली असते. श्वासगती कमी केली की छातीतील धडधड कमी होते. शरीर शांतता स्थितीत येते. याचसाठी दीर्घ श्वसन तणाव कमी करणारे प्रभावी शिथिलीकरण तंत्र आहे.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2020 12:05 am

Web Title: article manovedh akp 94 7
Next Stories
1 सावधान, वनस्पतीप्लावक घटताहेत..
2 मनोवेध : तणाव व्यवस्थापन
3 कुतूहल : जागतिक तापमानवाढ
Just Now!
X