29 March 2020

News Flash

मनोवेध : कर्ता आणि साक्षी

श्वासगती बदलतो, प्राणायाम करतो त्या वेळी आपण कर्ता असतो.

मानसिक तणाव लगेच कमी करण्यासाठी दीर्घ श्वसन उपयोगी असते; मात्र त्यामुळे असा तणाव येण्याची सवय बदलत नाही. याचे कारण आपण असे दीर्घ श्वसन करू लागतो, त्या वेळी आत्ताचा हा तणाव वाईट आहे, तो नको अशी प्रतिक्रिया करीत असतो. अशी प्रतिक्रिया हे भावनिक मेंदू ‘अमीग्डाला’चे काम आहे. मेंदूचा हा भाग अतिसंवेदनशील झाल्यानेच तणाव, भीती यांचे प्रमाण वाढत असते. असा वारंवार होणारा त्रास कमी करायचा असेल तर त्याची अतिसंवेदनशीलता कमी करायला हवी. ती दीर्घ श्वसनाने होत नाही.

ती कमी करण्यासाठी साक्षीभाव आवश्यक असतो. कोणतीही कृती करतो, काही बदल करतो त्या वेळी आपण कर्ता असतो. श्वासगती बदलतो, प्राणायाम करतो त्या वेळी आपण कर्ता असतो. मनातील विचार बदलण्याचा प्रयत्न करतो त्या वेळीही कर्ता असतो. साक्षीभाव म्हणजे हे काहीही करायचे नाही. शरीरात आणि मनात जे काही होते आहे ते जाणायचे; पण त्याला हे चांगले-हे वाईट अशी प्रतिक्रियाही करायची नाही. अशी प्रतिक्रिया न करणे म्हणजे साक्षीभाव! अशी प्रतिक्रिया करत नाही त्या वेळी ‘अमीग्डाला’वरील कामाचा बोजा आपण कमी करतो, सतत प्रतिक्रिया करण्याची गरज नाही असे प्रशिक्षण त्याला देत असतो. त्यामुळे त्याची अतिसंवेदनशीलता कमी होते.

त्यासाठी श्वासगती बदलण्याचा प्रयत्न न करता केवळ त्यावर लक्ष ठेवायचे. शांत बसून श्वास जाणत राहायचा, शरीरात बदल होतात त्यांना प्रतिक्रिया न करता ते जाणत राहायचे. मनात भीती, अस्वस्थता निर्माण करणारे विचार येत असतील तर त्यांनाही नाकारायचे नाही; पण त्यांना महत्त्वच द्यायचे नाही. आत्ता मनात हे विचार आहेत आणि शरीरात या संवेदना जाणवत आहेत, हे साक्षीभावाने अनुभवायचे. असे साक्षीभावात राहणे सोपे नसते. विपश्यना शिबिरात दहा दिवस हेच प्रशिक्षण दिले जाते. वेळ काढून त्याचा अनुभव घ्यायला हवा.

मात्र सर्वाना असे दहा दिवसांचे शिबीर करणे शक्य होत नाही. अशा वेळी थेरपिस्टच्या मदतीने पाच, दहा मिनिटे असा साक्षीभाव अनुभवता येतो. ऑडिओ ऐकून दहा मिनिटे त्याचा रोज सराव घरीच करता येतो. असा सराव केल्याने ‘अमीग्डाला’ची अतिसंवेदनशीलता हळूहळू कमी होते. परीक्षा किंवा अन्य कोणताही तणाव, भीतीची सवय दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. – डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2020 12:06 am

Web Title: article manovedh akp 94 8
Next Stories
1 कुतूहल : प्रवाळांचा रंग गेला कुठे?   
2 दीर्घ श्वसन : शिथिलीकरण तंत्र
3 सावधान, वनस्पतीप्लावक घटताहेत..
Just Now!
X