तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे जिवंत माणसाच्या मेंदूतील कोणता भाग ठरावीक काम करताना अधिक सक्रिय असतो, हे समजू लागले आहे. पूर्वी हे समजत नव्हते. त्यावेळी मेंदूचा ठरावीक भाग निकामी झाला तर त्या माणसाच्या कार्यावर कोणता परिणाम होतो, याचा अभ्यास करून मेंदूतील विविध भागांचे कार्य समजण्याचा प्रयत्न केला जात असे.

पॉल ब्रोका या फ्रेंच वैद्यकाने मेंदूच्या ठरावीक भागाला इजा झाल्यानंतर ज्यांची वाचा गेली अशा १२ जणांचे शवविच्छेदन करून त्याचा निष्कर्ष १८६५ मध्ये मांडला. मेंदूच्या पुढील भागात डाव्या बाजूला वाचा केंद्र असते, हे त्यांचे संशोधन मेंदूविज्ञानाचा पाया मानले जाते. मेंदूच्या त्या भागाला ‘ब्रोकाज् एरिया’ असे आजही म्हटले जाते. मेंदूच्या विविध भागांचे कार्य समजून घेण्याचे काम त्यानंतर सतत होत आहे. १९६० मध्ये पॉल मॅक्लिअन यांनी कार्यानुसार मेंदूचे तीन भाग सांगितले. तुम्ही अंगठा आत घेऊन तुमच्या हाताची मूठ केली तर मेंदूच्या तीन भागांची कल्पना करू शकता. या मुठीत मनगटाला जोडून तळहाताचा भाग असतो, तसा डोक्यात जैविक मेंदू असतो. तो शरीरक्रिया, शरीराचे तापमान, श्वसन नियंत्रित करतो. मुठीतील अंगठा म्हणजे भावनिक मेंदू! हा भाग भावनांचे केंद्र म्हणून ओळखला जातो. या भागात ‘अमीग्डाला’ हा धोका जाणवला की सक्रिय होणारा भाग आहे. त्याच्या शेजारी ‘हिप्पोकॅम्पस’ हा स्मृतीशी संबंधित भाग असतो. भावनांशी निगडित स्मृती अधिक स्पष्ट असतात, याचे कारण हेच असावे. मुठीतील बोटे जशी आहेत, तसा मेंदूत ‘कॉर्टेक्स’ हा बुद्धीशी संबंधित भाग असतो. जे काही आपण पाहतो, ऐकतो त्याचे आकलन या भागात होते. हाताच्या मुठीतील नखे आणि त्यामागील बोटे मेंदूतील ‘प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स’चे स्थान दर्शवतात. कपाळपट्टीच्या मागील हा भाग माणसात सर्वाधिक विकसित आहे. येथे भावनांचे नियमन करणारी केंद्रे असतात. ही केंद्रे सक्रिय असली तर माणसाला राग आलेला असूनही तो आकांडतांडव न करता योग्य वेळी योग्य प्रकारे भावना व्यक्त करतो. मात्र भावना तीव्र असतात त्यावेळी या केंद्रांना काम करण्याची संधीच मिळत नाही. त्यावेळी भावनिक मेंदू बेभान कृती घडवून आणतो. साक्षीध्यानाने मेंदूच्या प्रीफ्रण्टल कॉर्टेक्समधील भावना नियमन केंद्रे विकसित झाल्याने सैराट वागणे कमी होते, असे सिद्ध होत आहे.

– डॉ. यश वेलणकर

yashwel@gmail.com