आपला मेंदू प्रत्येक क्षणी काम करत असतो. शांत बसलेलो असतो, तेव्हाही मनात विचार चालू असतात. घरच्या घरी टीव्हीवर एखादी मॅच बघत असलो, नृत्याचे कार्यक्रम बघत असलो किंवा प्रत्यक्ष समारंभाच्या ठिकाणी, स्टेडियममध्ये असलो आणि इतरांची कौशल्यं बघत असलो तरीही आपला मेंदू शांत बसलेला नसतो. तो तिथेही कामात असतो.

काही नर्तक जर आपली कला दाखवत असतील किंवा खेळाडू खेळत असतील आणि आपण त्यांच्या हालचाली मन लावून बघत असू, तर ते बघण्यातून आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. आपण यात पूर्णपणे तल्लीन होतो. त्याचा आस्वाद घेतो. समरसून जातो.  खेळ, नृत्य किंवा एखादं कौशल्यं या हालचाली बघत असताना, आपल्या मेंदूमध्ये नेमकं काय होत असतं? ज्या वेळेला कोणतीही विशिष्ट हालचाल आपण बघत असतो, त्या वेळेला ती हालचाल मेंदूत साठवून ठेवत असतो. त्या हालचालीचं अनुकरण करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आपला मेंदू त्या हालचालींच्या पायऱ्या स्मरणशक्तीच्या केंद्रात टिपून ठेवत असतो. याचा अर्थ लगेच आपल्याला त्या निष्णात नर्तकाप्रमाणे नृत्य करता येणार नाही किंवा त्या कसलेल्या खेळाडूप्रमाणे खेळता येणार नाही. परंतु हातात बॅट घेतली तर साधारणपणे काय करायचं असतं हे आपल्याला माहीत असतं. तशा प्रकारच्या हालचाली करायचा आपण प्रयत्न करतो.

जेव्हा अशा प्रकारचं कौशल्य दाखवायची वेळ येईल त्यावेळेला आपण या मेंदूत साठवलेल्या कौशल्यांचं अनुकरण करत असतो. आपल्याही नकळत या कौशल्यांचा अभ्यास मनामध्ये चालू असतो.

अनुकरण करतच लहान मुलं केव्हा तरी आई-बाबांप्रमाणे वेगवेगळी कामं करायला शिकलेली असतात. घरी ज्या प्रकारे वागतात, तसंच वर्तन लहान मुलं करताना दिसतात. म्हणून असं म्हणतात की पालकांनी बोलण्यापेक्षा अनुकरणातून आदर्श घालून द्यावेत. कारण मुलं अनुकरण करत असतात तशी मोठी माणसेदेखील अनुकरण करत असतात.

मोठं झाल्यानंतरही आपण अनुकरणाचा हा भाग वगळून टाकत नाही, तर कायमच आपण अनुकरणशील असतो. म्हणूनच अनेकदा असं म्हटलं जातं की मित्र-मत्रिणीसुद्धा एकमेकांचे हावभाव, लकबी, हातवारे उचलतात. सर्व वयांत आपला मेंदू अनुकरणशील असतो, ही मोठी गोष्ट आहे.

– डॉ. श्रुती पानसे

  contact@shrutipanse.com