News Flash

कुतूहल : घरातील वायुप्रदूषणाचे दुष्परिणाम

कार्बन मोनोऑक्साइड सारख्या काही प्रदूषकांच्या उच्च पातळीमुळे व्यक्तीचा त्वरित मृत्यू देखील संभवतो

(संग्रहित छायाचित्र)

घरातील वायुप्रदूषकांचे परिणाम अल्प मुदतीच्या प्रभावापासून- उदा., डोळे व घशात जळजळ होणे; ते दीर्घकालीन प्रभावापर्यंत म्हणजे श्वसनसंस्थेच्या रोगांपासून ते कर्करोगापर्यंत जाऊन पोहोचतात. कार्बन मोनोऑक्साइड सारख्या काही प्रदूषकांच्या उच्च पातळीमुळे व्यक्तीचा त्वरित मृत्यू देखील संभवतो. एकूणच घरातील हवेचे प्रदूषण मुलांच्या, प्रौढांच्या नव्हे सर्वाच्याच आरोग्यावर विपरीत परिणाम करते. प्रदूषण करणाऱ्या इंधनांवर आणि उपकरणांवर अवलंबून असणाऱ्या घरांतील सदस्यांना आगीमुळे होणारे परिणाम, विषबाधा, स्नायूंच्या दुखापती आणि अपघात होण्याचा धोका जास्त असतो. ‘ईटीएस’ म्हणजे  (एव्हायर्न्मेंटल टोबॅको स्मोक) ला बऱ्याचदा ‘सेकंडहॅन्ड स्मोकिंग’ किवा निष्क्रिय धूम्रपान म्हणून संबोधले जाते. परंतु सर्वसाधारणपणे, लहान मुलांची फुप्फुसे अधिक संवेदनाक्षम असल्याने त्यांना याचा धोका फार मोठा असतो. त्यामुळे न्यूमोनिया, ब्राँकायटिस, दमा तसेच फुप्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. घरातल्या हवेतील कण-पदार्थ (पार्टिकल्स) हे देखील विशेष चिंतेचे प्रदूषक आहेत. यावरही सखोल संशोधन झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार या कण-पदार्थाच्या संपर्कात आल्यास माणसाच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होताना दिसतात. २.५ मायक्रॉन किंवा त्यापेक्षा लहान कण (पीएम) सामान्यत: अधिक धोकादायक असतात कारण ते शरीरातील लहान वायूमार्गापर्यंत पोहोचून वायूंच्या देवाण-घेवाणीवर विपरीत परिणाम करतात. एक मायक्रॉन किंवा त्यापेक्षा कमी आकाराचे अतिसूक्ष्म  कण अवयवांमध्ये आणि थेट उतींमध्ये-पेशींमध्ये  प्रवेश करू शकतात. काही जैविक प्रदूषक दूषित घटकांसह दु:सह्य़ता (अ‍ॅलर्जी) प्रतिक्रियांसाठी एखादी कळ असल्याप्रमाणे काम करतात.  अतिसंवेदनशीलते (हायपरसेंसिटिव्हिटी) बरोबरच न्यूमोनायटिस आणि दम्याचे काही प्रकार, इन्फ्लूएन्झा, गोवर आणि कांजिण्या यांसारखे  संसर्गजन्य आजार हवेत पसरतात. घरामधील हवेतील बुरशी, रोगजन्य विषारी पदार्थ बाहेर टाकतात. जैविक आणि इतर प्रदूषकांमुळे होणाऱ्या आरोग्य- समस्यांच्या लक्षणांमध्ये खोकला, घशाचा दाह, मळमळ, पचनसंस्थेशी निगडित समस्या, चक्कर येणे, ताप, सुस्तपणा, थकवा, धाप लागणे, शिंका येणे, स्नायू दुखणे वगेरे गोष्टी दिसून येतात. घरातील वायुप्रदूषणाला शास्त्रज्ञांनी केवळ कर्करोग होण्याच्या शक्यतेवर सर्वात महत्त्वाची पर्यावरणीय समस्या म्हणून स्थान दिले आहे. याव्यतिरिक्त ‘रेडॉन’ या किरणोत्सारी वायूचे कण श्वसन मार्गाने फुप्फुसांमध्ये प्रवेश करतात व तिथे साठून राहतात. कालांतराने फुप्फुसातील पेशींचा सतत दाह होऊन फुप्फुसाचा कर्करोग होतो. जगभरात दरवर्षी ‘रेडॉन’च्या संपर्कामुळे फुप्फुसाचा कर्करोग होऊन हजारो लोकांचा मृत्यू होत असल्याची नोंद आहे.

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2020 12:07 am

Web Title: article on adverse effects of indoor air pollution abn 97
Next Stories
1 कुतूहल : घरातील हवेचे प्रदूषण
2 मनोवेध : पचन समस्या
3 मनोवेध : पंचकोश
Just Now!
X