जेव्हा शुद्ध हवेत धूळ, धूर, धुरके, परागकण, बुरशी, जिवाणू, विषाणू आणि घातक वायू प्रवेश करतात तेव्हा हवेची गुणवत्ता ढासळते. ती अशुद्ध किंवा प्रदूषित होते. हवा किती शुद्ध आहे, हे हवेतील प्रदूषकांच्या प्रमाणावर ठरवण्यात येते. यासाठी स्वयंचलित यंत्रणेमार्फत हवेचे नमुने घेऊन रासायनिक विश्लेषण करण्यात येते आणि आलेल्या निष्कर्षांवरून हवेची गुणवत्ता एका निर्देशांकाच्या रूपात दर्शविण्यात येते. या निर्देशांकास ‘एअर क्वालिटी इण्डेक्स (एक्यूआय)’ असे म्हणतात. या पद्धतीमध्ये हवेची शुद्धता हिरवा, पिवळा, केशरी, लाल आणि जांभळा या पाच रंगांच्या पट्टय़ावर येणाऱ्या सांख्यिकी आकडय़ावरून दर्शवली जाते.

जर हवेची गुणवत्ता ० ते ५० या हिरव्या पट्टय़ामध्ये असेल, तर हवा ‘उत्तम’ आहे असे समजले जाते. ५१ ते १०० या पिवळ्या पट्टय़ात ती ‘ठीक’ असते आणि १०१ ते १५०च्या केशरी पट्टय़ात असेल तर श्वासोच्छ्वासास ती तेवढी योग्य नाही असे समजतात. पुढील दर ५० अंक वाढीला लाल, जांभळा असे पट्टे क्रमाने दाखवले जातात; या शेवटच्या रंगांच्या पट्टय़ांमधील हवा आरोग्यास घातक असते. अशी हवा आपणास वाहतूक सिग्नलच्या ठिकाणी, वाहतूक कोंडी होणाऱ्या अथवा गाडय़ांची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असते अशा ठिकाणी हमखास आढळते.

हवेची गुणवत्ता मोजण्याचे हे तंत्रज्ञान आपल्याकडे अमलात आल्यापासून केंद्रीय व राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांमार्फत ते देशाच्या २४० शहरांत राबविले जात आहे. लाल आणि जांभळा पट्टा दर्शविणारी हवेची गुणवत्ता लहान मुले, वृद्ध, गरोदर स्त्रिया, दमा रुग्ण, तसेच रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह अशा व्याधींनी ग्रस्त असलेल्यांसाठी निश्चितच योग्य नाही. वारा वाहात नसेल तर विविध प्रदूषके हवेत साचून हवेची गुणवत्ता २०० अंकांच्या पुढे जाऊन ती दूषित होते. हवेची गुणवत्ता ही त्या राष्ट्रामधील वाहनांची शिस्त, विकासाची गती, वैयक्तिक स्वच्छता आणि सुदृढ पर्यावरण मोजण्याचे एक साधन आहे.

कोविड-१९च्या साथीमुळे यंदा मार्चमध्ये भारतात देशव्यापी टाळेबंदी लागू झाली. टाळेबंदीच्या काळात रस्त्यांवरील वाहनांची ये-जा थांबली. कारखानेही गोठले. याचा परिणाम म्हणून भारतातील सर्वच लहान-मोठय़ा शहरांमधील हवेची गुणवत्ता सुधारली होती. परंतु टाळेबंदी शिथिल झाल्यापासून परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आली आणि अनेक शहरांत हवेची गुणवत्ता पुन्हा धोकादायक पातळीपर्यंत जाऊन पोहोचली.

– डॉ. नागेश टेकाळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org