20 September 2020

News Flash

कुतूहल : फुलपाखरांची शरीररचना

फुलपाखरांच्या शरीररचनेतील महत्त्वपूर्ण अवयवांची माहिती पुढीलप्रमाणे-

(संग्रहित छायाचित्र)

 

साधारणपणे तीन ग्रॅम एवढेसे वजन असूनही सुमारे तीन हजार किलोमीटपर्यंतचे उड्डाण करू शकणाऱ्या फुलपाखराच्या शरीराची रचना समजावून घेणे रंजक ठरेल. फुलपाखरांच्या शरीररचनेतील महत्त्वपूर्ण अवयवांची माहिती पुढीलप्रमाणे-

डोळे : फुलपाखराच्या डोळ्यांमध्ये सुमारे सात हजार दृश्यघटक व मज्जातंतू असतात. प्रकाश आणि अंधाराचा एकत्रित अनुभव त्यांच्या नेत्रपीटिकांना जाणवतो. भोवतालच्या हालचालींची जाणीव त्यातून त्यांना होते. डोळ्यांमधली दृश्यमानता टिकून राहण्याच्या गुणधर्मामुळे कमी प्रकाशातही त्यांना दिसते. दोन अर्धगोलाकार नेत्र असल्यामुळे फुलपाखरास ३६० अंशांतही दिसू शकते. ‘मॅप’, ‘पॉपिनजे’, ‘रेडआय’ यांसारख्या फुलपाखरांना अगदी ‘डोळे हे जुलमी गडे’ म्हणावे, अशा सुरेख नेत्रांचे वरदान लाभले आहे.

स्पर्शिका (अँटेना) : कपाळापासून निघणाऱ्या दोन स्पर्शिका या फुलपाखराच्या घ्राणेंद्रियाचे काम करतात. आजूबाजूच्या वातावरणाची माहिती, शत्रूची चाहूल, हालचाल आदी अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींचा मागोवा घेण्याचे काम या स्पर्शिकांमार्फत होते. याचबरोबर रासायनिक गंध ओळखणे, त्याचा मागोवा, उड्डाणदिशेचे आकलन, शरीराचा तोल सांभाळणे (जमिनीवर आणि हवेतसुद्धा) अशी अत्यंत महत्त्वपूर्ण कामेदेखील स्पर्शिकांमुळे होतात.

फुलपाखराची सोंड (प्रोबोसिस) : स्ट्रॉसारखा हा पोकळ, लांब अवयव प्रसंगी गुंडाळूनही ठेवला जातो. द्रवपदार्थ शोषून घेण्याचे काम फुलपाखरू याद्वारे करते. फुलातील मकरंद गोळा करण्याकरता, जमिनीतील क्षार टिपण्यासाठी सोंडेचा उपयोग होतो. प्रजातींनुसार सोंडेचा आकार व रंग भिन्न असतो.

पाय : सहा पाय असलेले फुलपाखराचे पुढील दोन पाय, हे त्याचे संवेदी अवयव असल्यामुळे खूप महत्त्वाचे असतात. या पायांना नियमित कार्याबरोबरच खाद्य वनस्पती शोधण्याचे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य करायचे असते.

पंख : पंखांच्या एकंदरीत दोन जोडय़ा- म्हणजे एकूण चार पंख असतात. पुढील व मागील पंख हे एकमेकांवर आच्छादित असून उड्डाण, हवेत तरंगणे, दिशाबदल यांसारख्या क्रिया पंखांमार्फत केल्या जातात.

फुलपाखराच्या शरीराचा भाग लंबगोलाकार असून त्यात श्वसन, प्रजनन आणि पचन संस्था असतात. छाती आणि उदर यांचा समावेश असतो. शरीरावरील छिद्रांमार्फत फुलपाखरे श्वसन करतात. पंखांना नियंत्रित करणारे स्नायूदेखील शरीरात असतात. फुलपाखराचे शरीर लवचीक असते. अंडी घालण्याच्या वेळी शरीर वक्राकार  करावे लागते, तेव्हा ही लवचीकता उपयोगी पडते.

अशी ही फुलपाखरे जैवपरिसंस्थेत मोलाची भूमिका पार पाडतात. त्यांच्याविषयी सजगता, जागरूकता वाढावी आणि फुलपाखरांविषयक अभ्यासाला चालना मिळावी, यासाठी यंदा ५ सप्टेंबरपासून ‘बिग बटरफ्लाय मंथ’ साजरा होणार आहे.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2020 12:07 am

Web Title: article on anatomy of butterflies abn 97
Next Stories
1 मनोवेध : स्वभावाला औषध
2 कुतूहल : फुलपाखरांचे आभासी रंग
3 मनोवेध : व्यक्तिमत्त्वातील विकृती
Just Now!
X