सुनीत पोतनीस

बहुतांश आफ्रिकन नवजात देशांमध्ये चीनची असलेली गुंतवणूक आणि चीनशी या देशांचे असलेले जवळचे व्यापारी संबंध लक्षणीय म्हणावेत, इतके आहेत. अनेक आफ्रिकन देशांमधून चीनला होणाऱ्या निर्यातीत पेट्रोलियमजन्य पदार्थाचा वाटा मोठा आहे. अंगोला या नैऋत्य आफ्रिकेतील नवनिर्मित देशाच्या बाबतीत तर हे प्रकर्षांने जाणवते.

पोर्तुगीज ही अंगोलाची राजभाषा. पोर्तुगीज भाषा सर्वाधिक बोलली जाऊन प्रचलित झालेला अंगोला हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश. पोर्तुगीज बोलणाऱ्यांना ‘लुसोफोन’ म्हणतात. नामिबिया, बोत्सवाना, झांबिया आणि कांगो यांनी तीन दिशांनी वेढलेल्या दक्षिण आफ्रिकेतल्या अंगोला या देशाची पश्चिमेकडची सीमा अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीपर्यंत आहे. रिपब्लिक ऑफ अंगोलाच्या राजधानीचे शहर लुआंडा हे अटलांटिक महासागराच्या किनारपट्टीवर वसले आहे.

गेल्या सहस्रकाच्या सुरुवातीला बांटू या जमातीच्या टोळ्यांनी या प्रदेशात स्थलांतर करून ते तिथे स्थायिक झाले. इतर अनेक जमातींच्या आदिवासींची तत्पूर्वी इथे वस्ती असली तरीही बांटूंनी या जमातींवर आपले वर्चस्व राखून राज्य उभारले. त्यांचा लोकप्रिय राजा ‘नंगोला’ याच्या नावावरून या देशाचे नाव पुढे ‘अंगोला’ झाले. इतर अनेक देशांप्रमाणे अंगोलात समुद्री मार्ग आणि नवीन भूप्रदेश शोधार्थ आलेले पहिले युरोपियन हे पोर्तुगीजच होत!

पंधराव्या शतकाच्या अखेरीस पोर्तुगीज खलाशी दिआगो कावो आफ्रिकेच्या दक्षिण भागात नवीन भूमीच्या शोधात अटलांटिक समुद्रमार्गे सध्याच्या अंगोलाच्या किनारपट्टीवर पोहोचला. तिथल्या काही दिवसांच्या वास्तव्यात दिआगो आणि त्याच्या तीस सहकाऱ्यांच्या लक्षात आले की, भारत आणि आग्नेय आशियाच्या युरोप आणि दक्षिण अमेरिका यांच्याशी चालणाऱ्या व्यापाराच्या मार्गात अंगोलाची सागरी किनारपट्टी अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे. सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात या पोर्तुगीजांनी त्या किनारपट्टीवरील प्रदेशात व्यापारी ठाणी वसवून आणखी काही पोर्तुगीज कुटुंबे या प्रदेशात आणली. अंगोलात आलेल्या पोर्तुगीजांनी पुढे १५७५ साली पोर्तुगालमधून शंभर कुटुंबे आणि चारशे सैनिक आणून ‘साओ पावलो डी लुआंडा’ ही वसाहत स्थापन केली. या वसाहतीचेच पुढे मोठे शहर बनून लुआंडा हे सध्या अंगोलाच्या राजधानीचे शहर झाले आहे.

sunitpotnis94@gmail.com