डॉ. श्रुती पानसे

सहसा मुलांची शाळा ही सहा ते सात तास असते. त्यापेक्षा काही शाळा या जास्त वेळाच्या असतात. पण कमी वेळाची शाळा नक्कीच नसते. यातला अर्धा तास हा डबा खाण्याच्या सुट्टीचा आणि अर्धा-पाऊण तास हा खेळ किंवा इतर अ‍ॅक्टिव्हिटीजसाठी गेला असं समजलं तरीसुद्धा किमान पाच – सहा तास अभ्यास होत असतो.

या पाच तासांमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं समजून घेणं, लिहून काढणं, प्रश्नोत्तरं अशा काही गोष्टींचा समावेश असतो. याशिवाय बहुतेक सर्व मुलं टय़ूशनला जातात. ती कमीत कमी एक ते दोन तासांची असते. अशा प्रकारे सात तास अभ्यास करून घरी आलेलं मूल घरच्या अभ्यासाला बसतं. एक-दोन तास घरचा अभ्यास चालतो. म्हणजे कमीत कमी आठ ते नऊ तास हा अभ्यासासाठी जातो. याशिवाय प्रवास, इतर छंदांचे अभ्यास हा भाग वेगळा.

कोणत्याही आई-बाबांची नोकरी आठ-नऊ तासांची असते. मोठय़ा वयातली नोकरी आणि लहान वयातला अभ्यास करून मिळणार काय, याची तुलना आपल्याला करावी लागेल. आपण नोकरी का करतो, त्यातून काय मिळणार आहे हे माहीत असतं. लहान मुलांना रोजचे आठ-नऊ तास अभ्यास करून मार्क मिळणार असतात. मार्क मिळवून नक्की काय करायचं आहे, ते महत्त्वाचे का आहेत, हे कळणं त्यांच्या भावविश्वात नसतं. आणि तरीही त्या मार्कासाठी मुलं दिवसभर सात आठ तास झगडत असतात.

ज्या वेळेस मुलांना आपण केलेल्या अभ्यासातून आनंद मिळेल, त्या वेळेला त्यांचा हा प्रवास अधिक आनंददायी होईल. आज ज्या पद्धतीचा अभ्यास केला जातो त्याला शिक्षा, धमकी याची जोड असते. हे मेंदूघातक काम वर्षांनुवर्ष चालू असतं. चांगल्या शिक्षकांचं आणि चांगल्या आई-बाबांचं काम हेच आहे की त्याला अभ्यास करताना आनंदाचे अनुभव दिले गेले पाहिजेत. तसे नसतील तर महाविद्यालय आणि पुढच्या काळात मेहनतीने अभ्यास करायचा असतो, त्यावेळी मुलं बंडखोर होतील.

आज जेव्हा डिग्रीचा कागद हातात घेतलेली मुलं असतात, पण त्यांचा आवश्यक अभ्यास झालेला नसतो. शिवाय कौशल्यंही विकसित झालेली नसतात. सगळ्याचा कंटाळा असतो असं निरीक्षण जाणकार मांडतात, तेव्हा या प्रश्नाची तीव्रता लक्षात येते.

contact@shrutipanse.com