सुनीत पोतनीस

आशियातल्या चार चिमुकल्या देशांनी १९६० ते १९९० या तीन दशकांमध्ये अल्पावधीतच व्यवसाय आणि औद्योगिक क्षेत्रात लक्षवेधी आघाडी घेतली. या देशांनी त्यांचा राष्ट्रीय विकासदर प्रतिवर्ष पाच-सहा टक्क्यांहूनही अधिक ठेवून जनतेच्या राहणीमानात झपाटय़ाने आमूलाग्र सुधारणा केली. या चार छोटय़ा देशांना जागतिक औद्योगिक क्षेत्रात ‘आशियाचे चार वाघ’ म्हटले जाते. या चार वाघांपैकी एक तैवान हा छोटा देश आहे.

गेल्या शतकाच्या मध्यावर तैवान हा एक स्वतंत्र, स्वायत्त देश म्हणून जगासमोर आला आहे. एक देश म्हणून तैवान चिमुकला असला, तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेला देश आहे. तैवान समस्येची गेली अनेक वर्षे चर्चा सुरू आहे. याचे कारण हा देश तेव्हा आणि आजसुद्धा अमेरिका आणि चीन यांच्यातील एक प्यादे होता व आहे. तिबेट, हाँगकाँग, शिंच्यांग वगैरेंप्रमाणेच चीनची आणखी एक दुखरी नस म्हणजे तैवान हा देश! विसाव्या शतकात झालेली दोन महायुद्धे व कम्युनिस्ट क्रांत्यांनंतरच्या जागतिक राजकीय उलथापालथीच्या परिणामस्वरूप जगाच्या पाठीवर जे अनेक देश उदयाला आले, त्यांपैकी तैवान हा एक आहे.

तैवानचे मूळचे नाव होते ‘फोर्मोसा’! चीन आणि फोर्मोसा (म्हणजेच सध्याचे तैवान) यांमध्ये सुमारे १३० किलोमीटर लांबीची तैवानची सामुद्रधुनी आहे. ही सामुद्रधुनी तैवानची सीमासंरक्षक म्हणूनही काम करते. सतराव्या शतकात डच, पोर्तुगीज, ब्रिटिश आणि फ्रेंच हे व्यापारी आणि वसाहतवादी युरोपीय दूरवर पूर्वेकडे आपापल्या व्यापारी ठाण्यांसाठी नवीन मोक्याचे प्रदेश शोधत होते. इ.स. १६२३ मध्ये डच तैवानमध्ये आले आणि त्यांनी तिथे व्यापारी ठाणे वसवले. त्या वेळी तिथे हजारएक चिनी वंशाच्या मच्छीमारांची वस्ती होती. इ.स. १६२४ ते १६६१ या काळात डच लोकांचे व्यापारी ठाणे आणि वसाहत तैवानवर होती. या बेटाचे नाव ‘फोर्मोसा’ हेसुद्धा या डचांनीच ठेवलेय!

चीनमध्ये त्या काळात मिंग घराण्याची राजवट होती. या राजवटीने तैवानमधील डचांना १६६१ साली हुसकावून लावले आणि पुढे १६८३ मध्ये चीनमधील तत्कालीन क्वींग राजवटीने मिंगचा पराभव करून तैवानवर कब्जा केला.

sunitpotnis94@gmail.com