05 March 2021

News Flash

मनोवेध : जाणीव/नेणीव

माणसाच्या जाणिवेत काय असते याचे संशोधन मेंदूविज्ञानात होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– डॉ. यश वेलणकर

मराठी संतांनी जाणीव आणि नेणीव हे शब्द वापरले आहेत. माणसाच्या जाणिवेत काय असते याचे संशोधन मेंदूविज्ञानात होत आहे. त्यामध्ये असे लक्षात आले आहे की, डोळ्यासमोर चित्र आहे हा संदेश तीस मिनी सेकंदात मेंदूत पोहोचतो. मेंदूत तो दृष्टीशी संबंधित भागात, थालामास आणि भावनिक मेंदूत जातो. मात्र तो संदेश नेणारी विद्युत लहर मेंदूच्या पुढील भागात पोहोचत नाही तोपर्यंत ते चित्र जाणिवेत येत नाही. त्यासाठी साडेतीनशे मिनी सेकंद लागतात. एक सेकंदात एक हजार मिनी सेकंद असतात. म्हणजे साधारण एकतृतीयांश सेकंदानंतर समोरील चित्राची ‘ते आहे’ अशी माणसाला जाणीव होते. ते चित्र त्यापूर्वीच हलवले तर मेंदूतील संदेश पुढील भागापर्यंत न पोहोचताच शांत होतो. त्यामुळे त्या चित्राची जाणीवच माणसाला होत नाही. असेच अन्य माहितीचेही होते. याचा अर्थ आपण अनुभवतो ते विश्व एकतृतीयांश सेकंदापूर्वीचे असते. रोजच्या आयुष्यात एकतृतीयांश सेकंदात समोरील वस्तू बदलत नाहीत त्यामुळे माणसाचा फार गोंधळ होत नाही. ‘स्क्रीन’वर अशी वेगाने बदलणारी अक्षरे किंवा फोटो दाखवणे शक्य आहे. अशा दृश्यांचा परिणाम जाहिरात म्हणून होऊ शकतो असे अजून सिद्ध झालेले नाही. म्हणजे मोबाइलच्या स्क्रीनवर दोनशे मिनी सेकंद टिकणारा एखाद्या वस्तूचा फोटो वारंवार दाखवला तर नंतर तीच वस्तू घ्यावी असे वाटत नाही. असे शब्द स्क्रीनवर दाखवले तर त्याची जाणीव त्या वेळी होत नाही. पण नंतर स्क्रीनवर दाखवलेले आणि न दाखवलेले अशा शब्दांची एकत्र यादी दाखवली आणि नंतर कोणते शब्द आठवतात असे विचारले तर, जाणिवेत न आलेले पण स्क्रीनवर दाखवलेले शब्द लक्षात राहण्याचे प्रमाण अधिक असते. याचाच अर्थ या नेणिवेतील अनुभवांचा स्मृतीवर परिणाम होत असतो. बरीचशी स्मृती ही नेणिवेतच असते. माणसाला मनात जाणवते त्यापेक्षा जाणीव न होणारे बरेच काही असते. मन फनेलच्या पसरट भागासारखे आहे. मेंदूत असंख्य लहरी निर्माण होतात त्यामधील ३५० सेकंद टिकणारे संदेश हेच जाणिवेत येतात. त्यांनाच आपण विचार म्हणतो. जाणीव आणि नेणीव एकमेकांवर परिणाम करीत असतात. जाणिवेत जे काही येते त्यावरच माणूस लक्ष देऊ शकतो. शांत बसून मनात आपोआप येणाऱ्या विचारांना जाणत राहिले की नेणिवेत काय साठवलेले आहे हे समजते.

yashwel@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2020 12:08 am

Web Title: article on awareness abn 97
Next Stories
1 कुतूहल : हवा प्रदूषण व अनारोग्य
2 मनोवेध : अल्झायमरची गती 
3 कुतूहल : हवेची गुणवत्ता
Just Now!
X