डॉ. रंजन गग्रे

अँटनी व्हॅन ल्यूएनहॉक हा संशोधकवृत्तीचा डच व्यापारी १६६८ साली लंडनमध्ये असताना, रॉयल सोसायटीचा सचिव असणाऱ्या रॉबर्ट हूकने लिहिलेले ‘मायाक्रोग्राफिया’ हे पुस्तक त्याच्या वाचनात आले. त्या पुस्तकात रॉबर्ट हूकने दोन भिंगांच्या सूक्ष्मदर्शकाची माहिती दिली होती. यातले एक भिंग वस्तूपासूनचा प्रकाश गोळा करायचे आणि दुसरे भिंग त्यातून मिळालेली प्रतिमा मोठी करायचे. कीटक व त्यांचे अवयव या सूक्ष्मदर्शकातून कसे दिसले, याचे वर्णन रॉबर्ट हूकने या पुस्तकात केले आहे. या पुस्तकातील माहितीचा उपयोग करून ल्यूएनहॉकने स्वतच एक साधा, एका भिंगाचा सूक्ष्मदर्शक बनवला. या छोटय़ा सूक्ष्मदर्शकाची लांबी अवघी आठ-दहा सेंटिमीटर होती. यातून नमुन्याचे निरीक्षण करण्यासाठी दोन पट्टय़ांमध्ये, छोटय़ाशा छिद्रात बसवलेले भिंग डोळ्यांच्या अगदी जवळ धरून पाहावे लागे. नमुना पुढे-मागे करण्यासाठी आटय़ांची सोय होती. त्या काळातील सर्वसाधारण सूक्ष्मदर्शकांची, वस्तू मोठी करून दाखवण्याची क्षमता वीस ते तीसपटींच्या दरम्यान असताना, ल्यूएनहॉकच्या सूक्ष्मदर्शकाची वस्तू मोठी करण्याची क्षमता मात्र दोनशे ते तीनशेपट होती. ल्यूएनहॉकने आपली भिंगे अतिशय काळजीपूर्वक घासून तयार केली असल्यामुळे, त्याला इतक्या क्षमतेचा सूक्ष्मदर्शक बनवणे शक्य झाले. याच सूक्ष्मदर्शकातून ल्यूएनहॉक याने विविध जिवाणूंची निरीक्षणे करून त्यांच्या तपशीलवार नोंदी केल्या.

दिनांक ९ ऑक्टोबर १६७६ रोजी ल्यूएनहॉकने आपला पहिला सूक्ष्मदर्शक लंडनच्या रॉयल सोसायटीला सादर केला आणि १९ नोव्हेंबर १६७७ रोजी आपली पहिली निरीक्षणे त्याने रॉयल सोसायटीला पाठवली. रॉयल सोसायटीचा सचिव असणाऱ्या रॉबर्ट हूकने या निरीक्षणांची सत्यता पडताळून पहिली. जिवाणूंचे दंडाकृती आकार, वर्तुळाकार आणि सर्पिल आकार, असे आकारावर आधारलेले तीन प्रकार ल्यूएनहॉकने सचित्र सादर केले होते. याखेरीज त्याने पाण्यातील जिवाणू, शैवाल, दातांवरील आणि ओठांवरील जिवाणू, मातीतील जिवाणू हेसुद्धा सूक्ष्मदर्शकाखाली बघून त्यांची हालचालदेखील नोंदवली होती. सूक्ष्मदर्शकाखाली पाहिलेल्या नमुन्यांचे अचूक वर्णन त्याने डच भाषेत केले होते. या डच लिखाणाचे इंग्रजी आणि लॅटिन भाषांतर ‘फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स ऑफ रॉयल सोसायटी’मध्ये प्रकाशित झाले आणि जिवाणूंच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब झाले. अँटनी व्हॅन ल्यूएनहॉक याने केलेल्या जिवाणूंच्या या निरीक्षणांनी सूक्ष्मजीवशास्त्राचा पाया घातल्याचे मानले जाते.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२ 

office@mavipamumbai.org