उत्तर प्रदेशातील दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुंदेलखंडातील चित्रकूट, भरतपूर हा परिसर ओसाड आणि नापीक जमिनीचा प्रदेश. परंतु गेल्या दशकभरात या परिसराचा कायापालट होऊन घनदाट वृक्षराजी येथे वाढली आहे. ही वृक्षराजी वाढवण्याचे, जोपासण्याचे काम कुणा संस्थेने अथवा सरकारी वन विभागाने केले नसून, भरतपूर येथील भैयाराम यादव या सर्वसामान्य स्थानिक नागरिकाने केले आहे. पत्नी व मुलाच्या अकाली मृत्यूने व्यथित होऊन रानोमाळ भटकंती करत असताना ‘एक वृक्ष- शंभर मुलांच्या बरोबर’ अशा अर्थाचे एक घोषवाक्य असलेला फलक दिसला आणि जणू भैयाराम यादव यांना उर्वरित आयुष्य जगण्यासाठी प्रेरणा व बळ मिळाले. सुरुवातीला त्यांनी वन विभागाकडून पाचशे झाडे विकत घेऊन वृक्षारोपणास आरंभ केला. भरतपूरच्या त्या ओसाड डोंगरावर गेली १२ वर्षे न थकता त्यांनी झाडे लावली आणि बघता बघता तब्बल ४० हजार झाडांचे हिरवेगार वनक्षेत्र उभे राहिले. हे क्षेत्र आज ‘भरतवन’ या नावाने ओळखले जाते, तर या झाडांची स्वत:च्या मुलांप्रमाणे निगा राखणाऱ्या भैयाराम यांना ‘वृक्षपुरुष’, ‘वृक्षपिता’ अशी ओळख मिळाली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भैयाराम यांनी इतक्या वर्षांत कोणतीही सरकारी मदत न घेता हे काम केले असून, कित्येक मैल पायपीट करून पाणी आणून ही झाडे त्यांनी वाढवली आहेत.

या झाडांना जोपासताना, प्रत्येक झाडावर ते स्वत:च्या मुलाप्रमाणे प्रेम करू लागले. त्यांना वाढवण्यासाठी घर सोडून डोंगरावर येऊन राहिले. २००८ पासून भैयाराम यांनी आपले आयुष्य पूर्णपणे पर्यावरणासाठी वाहिले आहे. ओसाड जमीन झाडे लावण्यासाठी उपयुक्त व्हावी म्हणून छोटय़ा टेकडय़ा त्यांनी फोडल्या आणि लागवड सुरू केली. जवळपास ५० हेक्टरहून अधिक नापीक, खडकाळ प्रदेश त्यांनी वनक्षेत्रात रूपांतरित केला आहे. सध्या त्यांच्या वनक्षेत्रात ४० हजारांहून अधिक झाडे असून यामध्ये सागवान, पिंपळ आदी वृक्षांबरोबरच आंबा, पेरू यांसारख्या अनेक फळझाडांचाही समावेश आहे. त्यामुळे विविध वृक्षसंपदेची एक परिसंस्थाच इथे तयार झाली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत अनेक पक्षी, प्राणी या डोंगराच्या हिरव्यागार वनराईत दाखल होतात. या अशा पर्यावरणप्रेमी अवलियामुळेच आज भरतपूरचे ‘भरतवना’मध्ये रूपांतर झाले आहे. भैयाराम यांच्यासारखे झपाटलेले कार्यकर्ते प्रत्येक गावाला- जिल्ह्य़ाला मिळाले तर भारत देश नक्कीच हिरवाईने समृद्ध होईल.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org