जगण्याच्या धावपळीत आपल्या ‘भवताला’कडे कळत-नकळत आपले दुर्लक्ष होते. सर्वत्र निसर्गाचा होणारा ऱ्हास बघून आपण हेलावून जातो खरे; पण आपण जिथून आलो, जिथे आपली पाळेमुळे रुजली आहेत, त्या परिसराचा आपल्याला विसर पडलेला असतो. पण प्रणबेश मैति या सुंदरबनच्या भूमिपुत्राने वेगळा विचार केला. जगातील सर्वात मोठे समजले जाणारे कांदळवन जंगल म्हणजे सुंदरबन. मानवी हस्तक्षेपांमुळे, नैसर्गिक आपत्तींमुळे या सुंदरबनच्या होणाऱ्या हानीविषयी बातम्या, लेख प्रणबेशच्या वाचनात येत होते. त्याने अस्वस्थ होऊन, सुंदरबनसाठी आपण काही तरी केले पाहिजे असा विचार करत नोकरी सोडून तो सुंदरबनला परतला.

प्रणबेश मैति हा सुंदरबनच्या ‘सागर’ बेटावरील एका शेतकरी कुटुंबातील तरुण. २००९ सालच्या ‘आयला’ चक्रीवादळात या बेटावर मोठय़ा प्रमाणात हानी झाली होती. बेटाचे चित्रच बदलून गेले होते. समुद्राचे खारे पाणी शेतजमिनींत शिरल्याने त्या नापिक झालेल्या. यामुळे ग्रामस्थांचा पारंपरिक रोजगार धोक्यात आला असतानाच, वाघांचे मानवी वस्तीत हल्लेही वाढू लागले आणि या हल्ल्यांत अनेक ग्रामस्थ ठार झाले. या वादळाने केलेली ही दुर्दशा पाहून प्रणबेशने या समस्येचे मूळ शोधले असता, किनाऱ्यांचे रक्षण करणाऱ्या खारफुटीच्या जंगलांची बेसुमार तोड आणि काही परिसरांत झालेली खारफुटीची चुकीच्या पद्धतीने लागवड हे यास कारणीभूत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हे जंगल पुन्हा उभारण्याचा त्याने निश्चय केला.

या परिसरातील गोसाबा नदी आणि तिच्या आसपासच्या भागातील जैवविविधतेचे संरक्षण-संवर्धन, खारफुटीची रोपवाटिका आणि याच अनुषंगाने या परिसरातील ग्रामस्थांना रोजगार हे उद्दिष्ट ठेवून आज प्रणबेश मैति कार्यरत आहे. त्याने स्थानिकांच्या मदतीने आतापर्यंत नदीकाठच्या चार कि.मी. अंतरावर खारफुटीची जवळपास दीड लाख रोपे लावून ती वाढवली आहेत. आता त्याचे रूपांतर एका जंगलात झाल्याने, याचा त्या क्षेत्राच्या जैविक आणि सामाजिक विविधतेवर सकारात्मक प्रभाव पडताना दिसत आहे. त्याचबरोबर पर्यावरणीय समतोल राखत ३००हून अधिक कुटुंबांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ‘सुंदरबन ग्रीन एन्व्हायर्नमेंट असोसिएशन’ हा उपक्रम प्रणबेशने हाती घेतला असून, याअंतर्गत आता सागर बेटाभोवती खारफुटीची भिंत उभारून भविष्यातील नैसर्गिक संकटे किनाऱ्यावरूनच परतवून लावण्याचे स्वप्न प्रणबेशने स्थानिकांमध्ये पेरले आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org