जैविक विविधता कायदा, २००२ मधील एका तरतुदीनुसार संपूर्ण देशात स्थानिक पातळीवरील जैवविविधतेचे जतन व संवर्धन व्हावे या हेतूने ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेने ‘जैवविविधता व्यवस्थापन समिती’ स्थापन करणे अपेक्षित आहे. जैवविविधतेचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करायचे असेल, तर त्या त्या गावातील/ नगरातील जैवविविधतेची व्याप्ती किती आहे, याचा अभ्यास करणे आवश्यक असते. म्हणून या समितीची महत्त्वाची जबाबदारी म्हणजे, स्थानिक नागरिकांचे अनुभव व पारंपरिक ज्ञान आणि तज्ज्ञांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यांची योग्य सांगड घालून त्यांच्या सहभागाने स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली जैविक संसाधने, त्यांचे औषधी गुणधर्म किंवा अन्य पारंपरिक उपयोग यांविषयीची सविस्तर माहिती गोळा करून, ती एकत्र करून त्याची नोंदवही तयार करणे. म्हणूनच या नोंदवहीला ‘पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर’ अर्थात जन-जैवविविधता नोंदवही असे संबोधण्यात येते.

सर्वसाधारणपणे गावकरी किंवा जंगलातील आदिवासींचे समूह त्यांच्या पातळीवर, त्यांच्या परीने जैवविविधतेचे जतन करीत असतातच. परंतु त्यांना यासाठी अधिक सजग आणि संवेदनशील करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. अशा प्रकारच्या दस्तावेजातील माहितीच्या आधारे मासे व अन्य प्राणी आणि वनस्पती यांच्या स्थानिक व प्रदेशनिष्ठ प्रजाती, अन्नधान्य, वन्यजीवांचे अधिवास, नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेले प्राणी व वनस्पती या सर्वाचे जतन आणि संवर्धन करणे अधिक सोपे होईल आणि स्थानिकांचे स्वामित्व हक्क आणि पारंपरिक ज्ञान यांचेदेखील जतन केले जाईल.

या नोंदवहीत साधारणपणे पुढील माहितीचा समावेश असतो : (१) उपलब्ध भूप्रदेशातील विविध जलस्रोत (२) वनआच्छादनाचे प्रमाण (३) अन्नधान्य, फळबागा, फुलबागा आदींची माहिती (४) रानटी वनस्पती, वन्यप्राणी, पक्षी, कीटकांच्या प्रजाती आदींची माहिती आणि (५) पशुधना(पाळीव प्राणी)बद्दलची माहिती.

या नोंदवही प्रकल्पात स्थानिक व्यवस्थापन समितीसोबतच शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, संशोधक, सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते यांचा सहभाग मोलाचा ठरतो. या नोंदवहीतील विदा (डेटा) जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या जैवविविधता व्यवस्थापन समित्यांना त्यांचे अहवाल तयार करण्यासाठी आणि जैवविविधतेचे योजनाबद्ध व्यवस्थापन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते.

प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org