जैवविविधता उद्यान साकारताना, सर्वात प्रथम सभोवतालच्या सृष्टीतील विविध सजीवांना त्याकडे कसे आकृष्ट करता येईल याचा विचार करावा लागतो. उद्यान कोणासाठी आणि कुठे निर्माण करायचे हे ठरले की त्याचे  योग्य प्रकारे नियोजन आणि अंमलबजावणी करता येईल. त्या दृष्टीने उद्याननिर्मितीतले काही महत्त्वाचे टप्पे समजून घेऊ या..

(१) प्रकल्पाची व्याप्ती : घराभोवतीची जागा, वसाहत, शाळा-महाविद्यालयाचे आवार, कार्यालयांचा परिसर, महापालिका उद्यान.. यांसारख्या ठिकाणी जैवविविधता उद्यान साकारायचे असल्यास प्रकल्पाचे लाभार्थी, जागेचे क्षेत्रफळ, मनुष्यबळ, आर्थिक तरतूद आदी मुद्दे विचारात घ्यावेत.

(२) योग्य जागा : सूर्यप्रकाश आणि पाणी मुबलक मिळेल अशी योग्य जागा शोधणे. उपलब्ध असलेल्या जागेनुसार आपण वेगवेगळ्या कल्पनांवर आधारित जैवविविधता उद्याने निर्माण करू शकतो.

(३) कल्पकता : मोठी आणि मोकळी जागा असेल तर आपल्या कल्पक बुद्धीने आकर्षक आणि शास्त्रीयरीत्या योग्य असा बागेचा आराखडा तयार करणे. या कामासाठी प्रशिक्षित उद्यान रचनाकारांची मदत घेता येईल.

(४) योग्य वनस्पतींची निवड : एकदा का जागा आणि बागेचा आराखडा तयार झाला, की अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे योग्य अशा झाडाझुडपांची निवड. आपले उद्यान आकर्षक आणि मनोरंजक शिक्षण साधन होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पक्षी व फुलपाखरांना आणि इतर कीटकांना आकृष्ट करण्यासाठी आवश्यक प्रजातींची आकर्षक फुलझाडे, फळझाडे लावावीत.

(५) माती, कंपोस्ट आणि शेणखत, पाणी : जागेच्या क्षेत्रफळानुसार माती आणि खत किती प्रमाणात लागेल, ठिबक सिंचन करायचे की फवारे लावायचे, याचाही प्रकल्पाच्या आर्थिक नियोजनात विचार करावा.

(६) मार्गिका : उद्यानातून फिरताना, गटचर्चा करताना तेथील झाडांना इजा पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी पुरेशी रुंद मार्गिका उद्यानात असावी.

(७) माहितीफलक : ठिकठिकाणी योग्य अंतरावर निवडक पक्षी, फुले, वनस्पती, कीटक, फुलपाखरे यांची रंजक आणि शास्त्रीय माहिती देणारे फलक लावले, तर अभ्यागतांना दृष्टिसुखाबरोबर निसर्गरक्षणाचेही भान येईल.

(८) मनुष्यबळ : चांगले उद्यानकर्मी, तरुण कल्पक विद्यार्थी, निसर्गप्रेमी स्वयंसेवक आणि काही कुशल-अकुशल कामगारांच्या साहाय्याने आपली जैवविविधता बाग प्रत्यक्षात साकारता  येईल. आपली बाग ही एक परिपूर्ण सजीव परिसंस्थाच आहे हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. आपण स्वत: तिची निगराणी केली तरच आपले उद्दिष्ट योग्य कालावधीत साध्य होईल.

– डॉ. सुगंधा शेटय़े

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org