जैवविविधता ही फक्त निसर्गापुरतीच मर्यादित नाही. आपल्याला दैनंदिन आहारात लागणाऱ्या आणि उत्तम पोषक तत्त्वे असणाऱ्या सर्व प्रकारच्या भाज्या, फळे, डाळी, कडधान्ये तसेच कापूस, ऊस यांसारखी नगदी पिके व फुलझाडे आणि अंडी, दूध, मांस यांसारखी पशुधनाची उत्पादने जैवविविधतेचाच भाग आहेत. आजमितीस औषधी वनस्पतींच्या शेकडो प्रजातींचा वापर प्रत्यक्ष औषधनिर्मितीसाठी करण्यात येतो आहे. जगातील ८० टक्के जनता या औषधी वनस्पतींवर निर्भर आहे.  या सर्वच उत्पादनांचे देशाच्या अर्थव्यवस्थेत खूप मोलाचे योगदान आहे; परंतु या जैविक संसाधनांची उत्पादकता आणि पोषक तसेच औषधी मूल्यांचे योग्य प्रमाण राखण्यासाठी जैवविविधतेचे इतर घटकदेखील खूप मोलाची कामगिरी बजावतात. शेतातील पिके असोत किंवा जंगलातील नैसर्गिक वनसंपदा, औषधी वनस्पती असोत; या सर्वाच्या सुदृढ वाढीसाठी लागणारी जमीनदेखील तेवढीच समृद्ध आणि कसदार असली पाहिजे. यासाठी या जमिनीत असलेले अगणित सूक्ष्म जीवजंतू आणि गांडुळांसारखे असंख्य प्राणी अहोरात्र कार्यरत असतात.

याव्यतिरिक्त जैवविविधतेची आणखी एक महत्त्वाची प्रणाली कार्यरत असते, ती म्हणजे परागीकरणाची! शेतीतील पिके किंवा अन्य वनस्पती यांच्या पुनरुत्पादन प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे परागीकरण! फलोत्पादनासाठी परागीकरण क्रिया खूप महत्त्वाची आहे. वनस्पतींच्या विश्वातील ८० टक्के वनस्पतींचे परागीकरण हे विविध प्रकारचे कीटक, पक्षी, वटवाघळे यांसारख्या जीवांच्या तब्बल दोन ते साडेतीन लाख प्रजातींच्या माध्यमातून होते. या सर्वामध्ये मधमाश्यांचे योगदान अत्यंत मौलिक आहे. जगातील झाडांच्या ७० टक्के प्रजातींच्या फलोत्पादनासाठी मधमाश्या अनिवार्य आहेत. आपले एकतृतीयांश अन्न हे थेट मधमाश्यांवरच अवलंबून आहे. परागीकरणाव्यतिरिक्त मधमाशा त्यांच्या पोळ्यातील मध, मेण आणि इतर आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे घटक पुरवतात. भारतात उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक मधाला देशांतर्गत आणि विदेशातील बाजारपेठेत मोठी मागणी आहे. या घटकांची वार्षिक उलाढाल तब्बल तीन हजार कोटी रुपये इतकी आहे.

भारतात प्राण्यांच्या माध्यमातून परागीभवन होऊन तयार झालेल्या भाज्यांची वार्षिक उलाढाल जवळपास ७२६ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स एवढी आहे! एकंदरीतच जगातील ८० टक्के अर्थव्यवस्था ही निव्वळ जैविक स्रोतांवर अवलंबून आहे. आपल्या जगण्यासाठी तरी हे जैविक धन जतन केले पाहिजे.

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org