News Flash

नवदेशांचा उदयास्त : सिएरा लिओनचे रक्तहिरे…

जगातल्या सर्वाधिक हिरे उत्पादक दहा देशांमध्ये सिएरा लिओनचा वरचा क्रमांक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

– सुनीत पोतनीस

अत्यंत मौल्यवान खनिजांनी समृद्ध भूगर्भ असलेला पश्चिम आफ्रिकेतल्या सिएरा लिओन या देशाची गणना जगातल्या अत्यंत गरीब देशांमध्ये व्हावी, हा मोठा विरोधाभास आहे. येथील जमिनीत मुबलक प्रमाणात सापडणाऱ्या खनिजांमध्ये हिरे, बॉक्साइट, सोने यांचा समावेश आहे. जगातल्या सर्वाधिक हिरे उत्पादक दहा देशांमध्ये सिएरा लिओनचा वरचा क्रमांक आहे.

नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात असेल, तर त्या देशाची आर्थिक भरभराट होणे हे साहजिकच ठरते. परंतु अनेकदा नेमके याचमुळे मोठ्या संकटांना आमंत्रण मिळते. सिएरा लिओनमध्ये काहीसे असेच घडले आहे, ते तिथे असलेल्या हिऱ्यांच्या मुबलक साठ्यांमुळे. एकोणिसाव्या शतकात आफ्रिकेतील डी बिअर या माणसाच्या शेतात हिरे सापडल्यावर काही उद्योजकांनी ते शेत स्वस्तात विकत घेऊन तेथून कोट्यवधी किमतीचे हिरे काढले. त्या उद्योजकांनी ‘डी बिअर्स’ या नाममुद्रेने हिऱ्यांचा व्यवसाय करून हिऱ्यांच्या अनेक खाणी विकत घेतल्या. अनेक वर्षे जगातील ९० टक्के हिरेपुरवठा ‘डी बिअर्स’ समूहाच्याच ताब्यात होता. पुढे सिएरा लिओनने हिरे व्यवसायाची सरकारी कंपनी स्थापन करून भरपूर पैसा कमावला आणि हे पैसे देशातल्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतविण्यात आले.

मात्र, पुढे बड्या देशांमधील शीतयुद्धानंतर उदय पावलेल्या अतिरेकी संघटनांनी या हिरे कंपन्यांच्या अनेक खाणींवर बळजबरीने ताबा मिळवला आणि हिऱ्यांची विक्री सुरू केली. अतिरेकी संघटना हे हिरे मोठ्या व्यापाऱ्यांना विकून त्याची किंमत पैशांमध्ये न घेता ‘एके-४७’सारख्या घातक शस्त्रांच्या स्वरूपात घेत. यामुळे हिऱ्यांचा सरकारी व्यापार बंद पडून सिएरा लिओनचे मोठे राष्ट्रीय उत्पन्न बंद झाले. सैन्याचे वेतन थकले. देशाचा सरकारी खजिना रिता होऊन हलाखीचे जीवन जगणारी जनता शस्त्रे घेऊन रस्त्यावर आली, यादवी युद्ध सुरू झाले. सिएरा लिओनमध्ये साधारणत: १५ वर्षे चाललेल्या या गृहयुद्धात हजारो माणसे मारली गेली. या रक्तरंजित गृहयुद्धाला कारणीभूत असलेल्या सिएरा लिओनच्या हिऱ्यांना त्यामुळे ‘ब्लड डायमंड’ असे नाव मिळाले. १९७० पासून पुढच्या दोन दशकांमध्ये या ‘ब्लड डायमंड’ व्यवहारामुळे आणि बोकाळलेल्या भ्रष्टाचारामुळे सिएरा लिओनची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली होती.

– सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 12:03 am

Web Title: article on blood diamonds of sierra leone abn 97
Next Stories
1 कुतूहल : प्रतिभावंत गणिती ऑयलर
2 कुतूहल : ग्रहणाचे गहन गणित
3 नवदेशांचा उदयास्त :  स्वतंत्र, स्वायत्त सिएरा लिओन
Just Now!
X