आज आपण सोफी जर्मेन या विलक्षण फ्रेंच गणिती महिलेविषयी जाणून घेऊ. त्यांचा जन्म १ एप्रिल १७७६ रोजीचा. वडील श्रीमंत रेशीम व्यापारी होते व त्यांचा मोठा ग्रंथसंग्रह होता. फ्रेंच राज्यक्रांतीचे ते दिवस असल्यामुळे बाहेरच्या अस्थिर वातावरणात वावरणे धोकादायक होते. त्यामुळे लहानगी सोफी घरी पुस्तके वाचत बसे. गणितात गढून गेलेल्या आर्किमिडीज्च्या दुर्दैवी मृत्यूची गोष्ट एका पुस्तकात वाचून तिच्या मनात गणिताचे आकर्षण निर्माण झाले. तिने गणिताचा अभ्यास सुरू केला. दिवस-रात्र त्यातच मग्न. आई-वडिलांना काळजी वाटू लागली. त्यांनी तिच्या मेणबत्त्या, उबेची शेगडी, एवढेच काय- उबदार कपडेही काढून घेतले, की जेणेकरून ती अभ्यासापासून परावृत्त होईल. पण ती मेणबत्तीचे तुकडे गोळा करून, चादरी अंगाभोवती लपेटून अभ्यास करू लागली.

अखेर आई-वडिलांचा नाइलाज झाला. फ्रान्समध्ये १७९४ साली सुप्रसिद्ध इकल पॉलिटेक्निकची स्थापना झाली. पण मुलींना तेथे तेव्हा प्रवेश नव्हता. मात्र, वडिलांच्या ओळखीमुळे सोफी यांना व्याख्यानांची टिपणे मिळण्याची व्यवस्था झाली. त्यांनी ‘ल ब्लांक’ हे पुरुषी टोपणनाव वापरून गणिती लाग्रांज यांना आपले गणितातील काम पाठवले. ते पाहून लाग्रांज इतके प्रभावित झाले, की त्यांनी प्रत्यक्ष भेटीला बोलावले. आता सोफी जर्मेनना आपली खरी ओळख उघड करावी लागली, पण लाग्रांजनी मदतच केली.

सोफी यांनी अंकशास्त्र आणि तन्यता (इलॅस्टिसिटी) या क्षेत्रांत काम केले. पुढे गाऊस या थोर गणितज्ञाशी पत्रव्यवहार सुरू केला. सुरुवातीस ‘ल ब्लांक’ या नावानेच पत्रे लिहिली. पुढे फ्रेंच-जर्मन युद्धकाळात, गाऊसना खरा पत्रकर्ता कोण हे कळले. त्यांनीही सोफींना प्रोत्साहन दिले. सोफींनी फर्माच्या शेवटच्या प्रमेयावर मूलभूत काम केले. जर ‘प’ आणि ‘(२प + १)’ या विषम मूळ संख्या असतील, तर अशा घातांकासाठी त्या प्रमेयाचा एक भाग सिद्ध केला. अशा संख्येला ‘सोफी जर्मेन मूळ संख्या’ म्हणतात. उदाहरणार्थ : ३, ५, ११, २३…

१८१६ साली सोफी जर्मेनना कंपनांवरील शोधलेखासाठी पॅरिसच्या विज्ञान अकादमीचे बक्षीस मिळाले. त्यांचे संशोधन आयफेल टॉवरच्या उभारणीत वापरले गेले. पण केवळ स्त्री म्हणून, त्यावरील श्रेयनामावलीत त्यांचे नाव कोरलेले नाही. गाऊस यांच्या प्रयत्नांमुळे सोफींना जर्मन विद्यापीठाची डॉक्टरेटची पदवी मान्य झाली होती; पण ती मिळण्यापूर्वीच कर्करोगाने १८३१ साली सोफी यांचा मृत्यू झाला. गणिती स्त्री संशोधकांचा मार्ग थोडाफार सुकर होण्यात सोफी यांच्या अथक प्रयत्नांचा महत्त्वाचा वाटा आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते :

‘तू मेणबत्तीचे तुकडे गोळा करून

गणित करता करता

स्वत:च मेणबत्ती होऊन गेलीस,

म्हणून प्रकाश पाहिला आम्ही’

– प्रा. श्रीप्रसाद तांबे

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org