– सुनीत पोतनीस

सोमालियाचा जमेल तेवढा प्रदेश बळकावण्याची चढाओढ ब्रिटन, इटली, इजिप्त, इथिओपिया वगैरे सहा देशांत सुरू होती. अमेरिका खंडातही प्रदेश बळकावण्यासाठी अशीच चढाओढ सुरुवातीला युरोपीय राष्ट्रांत होती. त्यात प्रामुख्याने ब्रिटन, फ्रान्स, स्पेन, पोर्तुगाल, नेदरलँड हे स्पर्धक होते. तसे पाहू जाता ब्रिटनला सोमालियात वसाहत स्थापण्यात रस नव्हताच. सोमालियाच्या बंदरपट्ट्यातून व्यापारी लाभ मिळवणे, तसेच सोमालियातून जाणाऱ्या व्यापारी मार्गावर दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप नको, या हेतूने सोमालियाचा काही प्रदेश मिळवण्याचा ब्रिटनचा प्रयत्न होता.

उत्तर सोमालियापासून जवळ एडनमध्ये ब्रिटिशांचे एक व्यापारी ठाणे आणि काही सैन्य होते व त्यावर ब्रिटिश भारतातल्या व्हाइसरॉयचे नियंत्रण होते. सोमालियात त्याकाळी स्थानिक राज्यकत्र्यांची लहान-मोठी राज्ये होती व त्यांचे आपापसातले संघर्ष ही नित्याची बाब होती. ब्रिटिशांनी ही गोष्ट बरोबर हेरून १८८४ साली इसाक, इसा वगैरे उत्तरेतील सोमाली राज्यांच्या सुलतानांशी त्यांच्या संरक्षण व इतर प्रशासनाचे करार केले. ब्रिटिश संरक्षित व प्रशासकीय अंमलाखाली असलेल्या उत्तर सोमालियाच्या या प्रदेशाचे नाव ‘ब्रिटिश सोमालीलँड’ होऊन त्याचे प्रशासन १८९८ पर्यंत ब्रिटिश भारत सरकारकडे होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस इटालियनांनीही दक्षिणेत आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. सोमाली लोकांमध्ये आता या परकीयांविरुद्ध वातावरण तयार व्हायला सुरुवात झाली होती. यातूनच १८९९ मध्ये मोहम्मद हसन या सुफी मुस्लीम झुंजार नेत्याच्या नेतृत्वाखाली ‘दर्विश’ नावाची चळवळ सुरू झाली. मोहम्मद हसन हा जसा लढाऊ नेता होता, तसाच उत्तम कवीही होता. ब्रिटिश, इटालियनांना सोमालियातून घालवून देणे, इथिओपियापेक्षा या चळवळीचे लष्करी सामथ्र्य वाढवून ख्रिस्तीधर्मीयांना सोमालियाबाहेर घालवून या संपूर्ण प्रदेशात इस्लामी सत्ता प्रस्थापित करणे हे हेतू ठेवून दर्विश चळवळ उभी राहिली. सोमालियातले पाच ते सहा हजार तरुण चळवळीत सामील होऊन ती फोफावली. १८९९ ते १९२० अशी २१ वर्षे त्यांनी सोमालियातली राजकीय परिस्थिती ढवळून काढली. बंदुका, हातबॉम्ब वगैरे शस्त्रसामुग्रीने सज्ज असे खडे सैन्यही त्यांनी तयार ठेवले होते.

sunitpotnis94@gmail.com