– सुनीत पोतनीस

मोठा समुद्रकिनारा आणि मोक्याच्या ठिकाणी बंदरे लाभलेल्या सोमालियात प्रवेश मिळविण्यासाठी युरोपीय आणि आफ्रिकी देशांमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या शेवटाकडे चुरस निर्माण झाली होती. त्याचबरोबर त्यांना विरोध करणाऱ्यांची सशस्त्र चळवळही तिथे सुरू झाली. मोहम्मद हसन या सुफी कवीच्या नेतृत्वात सुरू झालेल्या दर्विश चळवळीचा सामना प्रथम इथिओपियाच्या लष्कराशी होऊन, त्यात दर्विश विजयी झाल्यावर मोहम्मद हसनने आपला मोर्चा ब्रिटिश सोमालीलॅण्डकडे वळवला. सुरुवातीला १९०० ते १९२० या दोन दशकांत दर्विश चळवळीच्या सैन्याने अनेक वेळा ब्रिटिशांवर गनिमी हल्ले करून त्यांना सोमालियाच्या किनारपट्टीकडे हटवले. अखेरीस, तेव्हा ब्रिटनच्या वसाहतींविषयक खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या विन्स्टन चर्चिल यांच्या आदेशावरून ब्रिटिश फौजांनी बंदुका-तोफांनिशी दर्विशांवर हल्ले करून ही चळवळ दडपून टाकली. ब्रिटिश सोमालीलॅण्ड ही वसाहत प्रामुख्याने उत्तर सोमालियात होती.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटन, फ्रान्स, पोर्तुगाल वगैरे युरोपीय देशांनी दूरवरच्या प्रदेशांमध्ये वसाहती स्थापन केल्या होत्या. त्या काळात इटलीमध्ये आर्थिक परिस्थिती खालावली होती आणि मटण व इतर मांसाहाराचा तुटवडा होता. हे अन्नपदार्थ सोमालियात मुबलक प्रमाणात असल्यामुळे इटालियन जनतेने आणि नेत्यांनीही सोमालियात वसाहत स्थापन करण्यासाठी आग्रह धरल्यामुळे इटलीच्या राज्यकर्त्यांनी सन १८८० मध्ये सोमालियाच्या दिशेने मोहीम उघडली. सोमालियाच्या उत्तर सीमेला लागून असलेल्या एडनच्या आखातातून पुढे सुवेझ कालवामार्गे युरोपात व्यापारी मालवाहू जहाजे नेण्याचा समुद्री मार्ग होता. या व्यापारी मार्गावर आपले नियंत्रण ठेवून सोमालियात आपली वसाहत स्थापन करावी, हा हेतू या मोहिमेमागे होता. ब्रिटिशांनीही याच हेतूने उत्तरेत आपले बस्तान बसवून ब्रिटिश सोमालीलॅण्ड ही वसाहत स्थापन केली होती. इटालियनांनी या प्रदेशात आल्यावर येथील स्थानिक राज्यकर्त्यांवर हल्ले किंवा बळाचा वापर न करता त्यांच्या फायद्याचे काही करार करण्याचे धोरण ठेवले.

सन १८८८ ते १९०५ या काळात इटालियनांनी मध्य आणि दक्षिण सोमालियातील सुलतानांशी त्यांच्या राज्यप्रदेशाच्या संरक्षणाचे आणि प्रशासनाचे करार केले. त्याबदल्यात इटलीने वसाहतीसाठी जमीन व काही व्यापारी बंदरांची मालकी मिळवली. १९०८ पर्यंत इटालियनांनी संपूर्ण दक्षिण सोमालिया आणि बहुतांश मध्य प्रदेशांत पूर्ण नियंत्रण मिळवले. याच वर्षी त्यांची वसाहत या प्रदेशात स्थापन झाली.

sunitpotnis@rediffmail.com