आपण चिखलात बसलेली फुलपाखरे पाहिली असतील. ही फुलपाखरे जमिनीतून सोडियम, पोटॅशिअम यांसारखे क्षार घेत असतात. फुलपाखरांना सोंड असल्यामुळे, हे क्षार त्यांना द्रवरूपानेच लागतात. या क्षार जमवण्याच्या क्रियेला इंग्रजीत ‘मड पडलिंग’ असे म्हणतात. जमवलेले क्षार, छोटय़ा छोटय़ा अशा कुप्यांमध्ये साठवून ठेवले जातात. ज्या नर फुलपाखराकडे चांगल्या प्रकारचे क्षार जमलेले आहेत, ते नर एक विशिष्ट प्रकारचा ‘फेरोमोन’ (नैसर्गिक गंध) हवेत सोडतात. त्या गंधाची तीव्रता हे साठवलेल्या क्षारांचे द्योतक होय. या विशिष्ट प्रकारच्या फेरोमोनचे आकलन संबंधित प्रजातीच्या मादी फुलपाखराला होते आणि अशा नराकडे मादी आकर्षित होते.

फुलपाखरांची भावी पिढी सशक्त निपजण्यासाठी, नराला स्वत:ची प्रजनन क्षमता सिद्ध करावे लागते. सुदृढपणा, चापल्य असलेले नरच मादी फुलपाखरांना पसंत पडतात. या परस्परांना अजमावण्याच्या क्रियेला इंग्रजीत ‘कोर्टशिप’ असे म्हणतात. या काळात मादी फुलपाखरू नराची कसोटी पाहते. गिरक्या घेत चाललेला त्यांचा एकमेकांचा पाठलाग म्हणजे नृत्याचा लयबद्ध आविष्कारच! भर जंगलात ही कोर्टशिप पाहणे खूपच विलोभनीय असते. यानंतर फुलपाखरांचे प्रत्यक्ष मीलन होते. या मीलन काळात नराकडून मादीला त्या क्षारयुक्त कुप्या पुरवल्या जातात. या कुप्यांमधील शुक्राणू अंडय़ात सोडून, मग ही अंडी खाद्य वनस्पतींवर मादीमार्फत दिली जातात.

सुदृढता, चापल्य आणि सोडियम, पोटॅशिअम क्षार ज्या नरांकडे असतात, असे नर माद्यांना प्रजननासाठी विशेष प्रिय असतात. काही प्रजातींची फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात तीन ते चार वेळा प्रजनन करतात, तर काही प्रकारची फुलपाखरे ही त्यांच्या आयुष्यात एकदाच प्रजनन करू शकतात. ज्या प्रजातीची फुलपाखरे कमी अंडी देतात ती एकापेक्षा अधिक वेळा प्रजनन करतात. टावनी कोस्टर (कृष्णकमलिनी) या प्रजातीत सुमारे ४० ते ५० अंडी घातली जातात. म्हणून मग नर मीलनानंतर मादीचे उदर विशिष्ट रसायनाच्या साहाय्याने बंद करून टाकतो. मादीचे हे पहिले व शेवटचे मीलन ठरते. स्वत:च स्वत:च्या प्रजननावर नियंत्रण ठेवणारे हे अनोखे उदाहरणच म्हणायला हवे!

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org