06 August 2020

News Flash

कुतूहल : फुलपाखरू उद्यान

फुलपाखरांचे खुले उद्यान उभारताना सुरुवातीपासूनच भूप्रदेशाचे नियोजन करणे आवश्यक असते.

संग्रहित छायाचित्र

 

आपल्या आजूबाजूला बागडणारी फुलपाखरे पाहायला कोणाला आवडणार नाही? परंतु भारतीय वन्यजीव कायदा, १९७२ नुसार फुलपाखरांना बंद अधिवासात ठेवण्यास परवानगी नाही. या पार्श्वभूमीवर खुल्या फुलपाखरू उद्यानाचे महत्त्व अधिकच ठळकपणे जाणवते. असे खुले उद्यान आपल्या उपलब्ध जागेत, आवारात, परिसरात करता येण्यासारखे आहे. फुलपाखरांचे खुले उद्यान उभारताना सुरुवातीपासूनच भूप्रदेशाचे नियोजन करणे आवश्यक असते. यामध्ये उद्यानात भ्रमंती करण्यासाठी पद्धतशीर नियोजित केलेले पथमार्ग, भरपूर कोवळी उन्हे पडणारे भाग राहतील अशी व्यवस्था करणे, आदी बाबींचा समावेश असावा. नियोजनाचा दुसर टप्पा म्हणजे, योग्य वनस्पतींची लागवड करणे. फुलपाखरांना अंडी घालण्यासाठी आणि नंतर त्या अंडय़ांमधून बाहेर पडणाऱ्या अळ्यांसाठी ठरावीक प्रजातींच्या ‘खाद्य वनस्पती’ किंवा ‘होस्ट प्लान्ट्स’ आवश्यक असतात; तर कोशातून बाहेर पडलेल्या आणि पूर्ण वाढ झालेल्या फुलपाखरांना त्यांचे अन्न म्हणून ठरावीक प्रजातींच्या वनस्पतींच्या फुलांतील मधुरस (नेक्टर) आवश्यक असतो. त्यामुळे अशा दोन्ही प्रकारच्या वनस्पतींची लागवड आपण ठरवलेल्या भूप्रदेशात करणे आवश्यक असते.

आंबा, चिंच, पेरू, सीताफळ, अशोक, कुसूम ,अर्जुन, कडुनिंब, बहावा, आपटा यांसारखी झाडे, तसेच कढीपत्ता, लिंबू, पानफुटी, कणेर, रुई, ताग आदी फुलपाखरांच्या अनेक खाद्य वनस्पती आहेत. सदाफुली, रिठा, जमैकन स्पाइक, घाणेरी, एक्झोरा, बोगनवेल, रक्तकांचन, हळदीकुंकू यांसारख्या वनस्पतीही उपयुक्त ठरतात. उद्यानात जिथे प्रत्यक्ष सूर्यप्रकाश येत असेल अशा ठिकाणी मोठाले तुळतुळीत खडक मुद्दाम रचावेत. त्यावर बसणे फुलपाखरांना विशेष प्रिय असते. फुलपाखरे उन्हाळ्यामध्ये चिखलात सामूहिकपणे बसतात आणि मातीतील क्षार व आवश्यक खनिजे शोषून घेतात, ती क्रिया म्हणजे ‘मड पडलिंग’; मात्र त्यासाठी जंगलातून माती आणून कृत्रिमपणे जागा तयार करू नये, त्यावर फुलपाखरे फार काळ येत नाहीत असे अनुभवातून दिसून आलेले आहे. काही रुबाबदार फुलपाखरांना सडक्या फळांमधील रसच आवडतो. त्यामुळे आपल्या उद्यानात अति पिकलेली किंवा सडकी फळे जरूर ठेवावीत.

बहुतांश इमारतींमध्ये घरच्या घरीदेखील गॅलरीमध्ये/ टेरेसवर बाग तयार केली जातेच. अशा वेळी कढीपत्ता, लिंबू, झेंडू, सदाफुली, जास्वंद यांसारखी झाडे कुंडीत लावल्यास फुलपाखरांची संख्या निश्चित वाढेल. घरात किंवा इमारतीच्या परिसरामधील मोकळ्या जागेत अशा पद्धतीने उद्यान तयार करून आपणही घरबसल्या फुलपाखरू या अन्नसाखळीतील महत्त्वाच्या घटकाचे संवर्धन करू शकतो.

– दिवाकर ठोंबरे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 12:06 am

Web Title: article on butterfly garden abn 97
Next Stories
1 मनोवेध : ‘डिप्रेशन’चे प्रकार 
2 कुतूहल : फुलपाखरांचे मराठी नामकरण!
3 मनोवेध : मेंदूतील गॅमा लहरी
Just Now!
X