आदिम पेशींप्रमाणेच, बहुपेशीय प्राण्यांच्या इंद्रिये व उतींमधील पेशीही परस्परांशी संवाद साधण्यासाठी रासायनिक संकेतांचा वापर करत असल्याने रासायनिक संदेशन (केमिकल कम्युनिकेशन) हेही आदिम ठरते. रासायनिक संकेत हे हवा, पाणी व माती या माध्यमांतून फैलावू शकतात. यांचा वापर उजेडात व अंधारातही केला जाऊ शकतो. मार्गातील अडथळ्यांना वळसा घालून ते पसरू शकतात; परंतु हे संदेशन तुलनेने कमी वेगात होते. शिवाय रासायनिक संकेत नाहीसे होण्याला वेळ घेतात ज्यामुळे लागोपाठ निरनिराळे संकेत प्रसृत करता येत नाहीत. रासायनिक संकेतांच्या उगमाचा छडा सहजतेने लागत नाही. या सर्व गुणदोषयुक्त संकेतांचा वापर आदिजीवनापासून ते प्रगत बहुपेशीय वनस्पती व प्राणी यांत होताना दिसतो.

उतीमधील खेटून असणाऱ्या पेशी रासायनिक संकेत परस्परांत संक्रमित करू शकतात. शरीरात विविध ठिकाणी स्थित पेशी, उती व इंद्रियांचे सुसंचालन नलिकाविहीन ग्रंथींनी अभिसरण होणाऱ्या शरीरद्रवांमध्ये स्रवलेल्या संप्रेरक (हार्मोन्स) स्वरूपातील रासायनिक संदेशामार्फत होते. या अंत:संप्रेरकांसारखेच रासायनिक संकेत- जे शरीराबाहेर सोडून संदेशन घडवून आणतात, त्यांना ‘बहि:संप्रेरके’ (फेरोमोन्स) म्हणतात. बहि:संप्रेरकांचा वापर स्वत:ची ओळख, वर्चस्व, आधिपत्य सिद्ध करण्यासाठी अनेक सामाजिक घटक व प्राण्यांमध्ये केला जातो. मधमाश्या व मुंग्यांच्या वस्त्यांमधील राणी विशिष्ट रासायनिक संकेतांद्वारे नेतृत्व लादत असते. पिल्ले व पालक एकमेकांना विशिष्ट गंधाने ओळखतात. मुंग्या रासायनिक संकेतांमुळे ओळीत चालतात व मार्ग अचूक ओळखू शकतात. कुत्रे, कोल्हे, लांडगे अतिरिक्त अन्न जमिनीत पुरून त्यावर मूत्रविसर्जन करतात. ज्यामुळे त्यांना ही जागा पुन्हा सापडू शकते. स्वत:चा टापू (टेरिटरी) कुत्रे व मार्जारकुळातील सर्व प्राणी मूत्र विसर्जित करून चिन्हांकित करतात. वाघ-सिंहांचे पिंजरे दिसण्याआधी आपल्याला त्यांच्या वासानेच सापडू शकतात. धोक्याची सूचना देणारे गंध मुंग्या, उदमांजरे, मासे, साप असे अनेक प्राणी सोडतात. शार्क मासे रक्त-मांसाचा माग कित्येक शे मीटर अंतरावरून काढू शकतात. अनेक प्रजातींची हरणे व इतर अनेक खूर असणारे प्राणी खुरांवरील ग्रंथींतून स्रवणाऱ्या रसायनांचा उपयोग स्वदेश परिघ (होम रेंज) चिन्हांकित करण्यासाठी करतात. माजावर आल्याची सूचना अनेक प्राणी विशिष्ट स्राव वा गंधाद्वारे प्रसारित करतात. नदीतील नर सुसरींच्या नाकावरील (जबडय़ाच्या टोकावरील) गाठीतून निघणारा स्राव माद्यांना आकर्षून घेतो. अनेक कीटकही प्रजनन काळात सहचराला आमंत्रित करण्यासाठी रासायनिक संकेतांचा वापर करतात.

– डॉ. पुरुषोत्तम गो. काळे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org