एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस विल्यम हर्शलचा, सूर्याच्या वर्णपटातील तांबडय़ा रंगापलीकडेही अदृश्य किरण (अवरक्त किरण) असल्याचा शोध जाहीर झाला. जर्मनीतला तरुण संशोधक योहान रिटर याला या शोधाबद्दल माहिती मिळाली. तत्त्वज्ञानात रस असणाऱ्या रिटरचा निसर्गातील सममितीवर गाढ विश्वास होता. त्यानुसार हर्शलच्या शोधावर त्याने पुढचा विचार केला. प्रकाशाच्या वर्णपटात तांबडय़ा रंगाच्या पलीकडे जर अदृश्य किरण असतात, तर जांभळ्या रंगाच्या पलीकडेही अदृश्य किरण असले पाहिजेत. मात्र तांबडय़ा प्रकाशापलीकडे जशी तापमानवाढ होते, तेवढी वाढ जांभळ्या प्रकाशापलीकडे होत नसल्याचे हर्शेलला आढळले होते. त्यामुळे आता हर्शेलची तापमानवाढीची पद्धत योहान रिटरला वापरता येणार नव्हती. काही पदार्थावर सूर्यप्रकाशाचा परिणाम होत असल्याचे रसायनशास्त्रज्ञांना पूर्वीपासून माहीत होते. यातला एक पदार्थ होता, ‘हॉर्न सिल्व्हर’ हे सिल्व्हर क्लोराइडयुक्त चांदीचे खनिज. योहान रिटर याने प्रकाशकिरणांचे गुणधर्म तपासण्यासाठी करण्याच्या आपल्या प्रयोगांसाठी हाच पदार्थ वापरायचे ठरवले.

योहान रिटरने प्रथम काचेचा लोलक वापरून सूर्यकिरणांपासून सात रंगांचा वर्णपट मिळवला. त्यानंतर त्याने हॉर्न सिल्व्हर लिंपलेले कागद वर्णपटातील वेगवेगळ्या रंगांच्या पट्टय़ात ठेवून त्यावर प्रकाशकिरणांचा किती परिणाम होतो याचे निरीक्षण केले. तांबडय़ा रंगाचा हॉर्न सिल्व्हरवर होणारा परिणाम नगण्य होता, तर जांभळ्या रंगाच्या दिशेकडे जाता, प्रत्येक रंगाची काळवंडण्याची क्रिया अधिकाधिक प्रमाणात दिसून आली. जांभळ्या रंगामुळे होणारा परिणाम अर्थातच सर्वाधिक होता. रिटरच्या प्रयोगाचे मुख्य उद्दिष्ट हे जांभळ्या रंगापलीकडील अदृश्य प्रकाशकिरणांचा वेध घेण्याचे असल्याने, रिटरने जांभळ्या रंगापलीकडेही हॉर्न सिल्व्हरचे लिंपण केलेले कागद ठेवले होते. येथे हॉर्न सिल्व्हरच्या काळवंडण्याची प्रक्रिया अधिक मोठय़ा प्रमाणात घडून येत होती. योहान रिटरचा अंदाज खरा ठरला. दृश्य वर्णपटाच्या जांभळ्या बाजूच्या पलीकडील किरणांचे अस्तित्व सिद्ध झाले. रासायनिक क्रिया घडवून आणणाऱ्या या किरणांचा उल्लेख योहान रिटरने ‘रासायनिक किरण’ म्हणून केला. त्यानंतर अल्पकाळातच, या अदृश्य प्रकाशामुळे फॉस्फरससुद्धा चमकतो हे दिसून येऊन या किरणांच्या अस्तित्वाला बळकट पुरावा मिळाला. रिटरने हे निष्कर्ष ‘अ‍ॅनालेन डेर फिजिक’ या जर्मन शोधपत्रिकेत १८०१ आणि १८०३ सालच्या शोधनिबंधांद्वारे प्रसिद्ध केले. आज हे किरण ‘अतिनील किरण’ म्हणून ओळखले जातात.

– डॉ. वर्षां चिटणीस

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org