डॉ. यश वेलणकर

कोणत्याही घटनेला दिली जाणारी प्रतिक्रिया ठरलेली असते, असे  वर्तन चिकित्सक (बिहेव्हिअर थेरपिस्ट) म्हणतात. दैनंदिन आयुष्यात हे बऱ्याचदा दिसते. घरात पसारा दिसला की येणारा राग ही प्रतिक्रियाच असते. आपल्या राग, भीती, चिंता, कामवासना अशा अनेक भावना प्रतिक्रिया म्हणूनच निर्माण होतात. विसाव्या शतकातील प्रभावी मानसशास्त्रज्ञ असा लौकिक असलेले बी. एफ. स्किनर वर्तन चिकित्सकच होते. या प्रतिक्रिया कशा निर्माण होतात आणि बदलताही येतात, याविषयीचा सिद्धांत त्यांनी मांडला. तो ‘ऑपरंट कंडिशनिंग’ म्हणून ओळखला जातो. कोणत्याही प्राण्याचे वर्तन ही प्रतिक्रियाच असते. मात्र हे वर्तन त्या कृतीनंतर त्रास होणारे असेल, तर बदलले जाते. ज्या वर्तनानंतर सुखद अनुभव येतो, ते वर्तन केले जाते. सर्कशीतील किंवा प्राण्यांच्या कार्यक्रमांमधील खेळ याच सिद्धांतानुसार असतात. त्या खेळातील कुत्र्याने किंवा डॉल्फिनने उलटी उडी मारली, की त्याला बक्षीस म्हणून खायला दिले जाते. उडी मारताना त्रास होत असला, तरी बक्षिसासाठी डॉल्फिन पुन:पुन्हा उलटी उडी मारतो.

लहान मुलेही हेच करतात. रडले, आरडाओरडा केला की आपल्याला हवे तसे घडते, हे लक्षात आले की ते तसेच वागू लागते. रडले किंवा चिडले की आपल्याला हवे तसे घडते, असा वारंवार अनुभव आल्याने त्यांचे ‘कंडिशनिंग’ होते. याला स्किनर यांनी ‘रीइन्फोर्समेंट’ असा शब्द वापरला आहे. मोठे झाल्यानंतरही ती व्यक्ती तसेच वागते. मात्र बा जगात असे वागल्याने त्याच्या मनासारखे होतेच असे नाही. ते झाले नाही की तीव्र अस्वस्थता, उदासीनता येते. असेच ‘कंडिशनिंग’ अभ्यास करण्याविषयीही होते. लहानपणी ‘अभ्यास केलास की चॉकलेट मिळेल’ असे आमिष दाखवले जाते. त्यामुळे अभ्यास करण्यातील, ज्ञानप्राप्तीतील आनंद अनुभवलाच जात नाही. डॉल्फिनला उलटी उडी मारताना आनंद होत नसतो. नंतरचे बक्षीस मिळणे बंद झाले, की तो उडी मारायचे बंद करतो. असेच पौगंडावस्थेतील मुलांचे होते. आता त्यांना अभ्यास करण्यासाठी वेगळे आमिष लागू लागते. ते मिळाले नाही तर त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. हे टाळायचे असेल तर आई-बाबा आणि आजी-आजोबा यांनीही मुलांच्या हितासाठी अधिक सजग होऊन मुलांचे योग्य ‘कंडिशनिंग’ कसे करायचे, याचा विचार करणे आवश्यक आहे.

yashwel@gmail.com