– सुनीत पोतनीस

पश्चिम आफ्रिकेतील सिएरा लिओन या देशांत सोळाव्या शतकात पोर्तुगीज, डच आणि फ्रेंच कंपन्यांनी व्यापारी ठाणी वसवली. येथून प्रामुख्याने गुलामांचा व्यापार चालत असे. गुलामांचे आफ्रिकी दलाल येथील अंतर्गत प्रदेशातून गुलाम आणून या युरोपियन व्यापाऱ्यांना विकत असत. ब्रिटिशांपैकी अ‍ॅडमिरल जॉन हॉकीन्स याने १५६२ मध्ये प्रथम या प्रदेशातून ३०० गुलाम मिळवून ते वेस्ट इंडीज बेटांवरच्या स्पॅनिश वसाहतीत विकले. अठराव्या शतकात अनेक आफ्रो-अमेरिकींनी ब्रिटिश राजवटीकडे संरक्षण मागितले. या आफ्रो-अमेरिकी लोकांना ब्रिटनने गुलामगिरीतून मुक्त करून ब्रिटिश सैन्यात भरती केले होते. हे सैनिक पुढे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात ब्रिटिशांकडून लढले होते. त्या युद्धानंतर या लोकांनी पश्चिम आफ्रिकेत स्थायिक होण्याची इच्छा दर्शविल्यामुळे  ब्रिटिशांनी त्यांना सिएरा लिओनमध्ये काही जागा देऊन १२०० कुटुंबांचे पुनर्वसन केले. हे सर्व मुक्त गुलाम असल्याने या वस्तीचे नाव ‘फ्रीटाऊन’ झाले. यानंतरही ब्रिटिशांनी कॅनडा,अमेरिका येथून निर्वासित आफ्रिकी लोक आणून सिएरा लिओनमध्ये ब्रिटिशांची मोठी वसाहत निर्माण केली. १८०७ मध्ये ब्रिटिशांनी गुलामांच्या व्यापारावर बंदी घालून त्यांच्या सिएरा लिओन वसाहतीतल्या अनेक मुक्त गुलामांना ब्रिटिश लष्करात नोकऱ्या दिल्या. १८०८ साली संपूर्ण सिएरा लिओन आपली वसाहत बनल्याचे ब्रिटिशांनी  जाहीर केले. फ्रीटाऊन येथे ब्रिटिशांनी त्यांच्या वसाहतीची राजधानी केली. तेथून ब्रिटिश गव्हर्नर प्रशासकीय कारभार सांभाळत असे. फ्रीटाऊनच्या परिसरामध्ये ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था चांगली करून ते पश्चिम आफ्रिकेतले महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले. अनेक सुशिक्षित मुक्त गुलाम लोकांना ब्रिटिशांनी मोठ्या पगाराच्या, अधिकारी दर्जाच्या सरकारी नोकऱ्या दिल्या. त्यांनी आपल्या नावांमध्ये  बदल करून जीवनशैलीचेही ‘इंग्लिशीकरण’ केले.

पुढे १८८५ मध्ये युरोपीय राष्ट्रांच्या झालेल्या बर्लिन परिषदेनंतर ब्रिटिशांनी सिएरा लिओनच्या प्रशासनात महत्त्वाचे बदल केले. त्यांनी फ्रिटाऊनच्या किनारपट्टीच्या प्रदेशाला वरच्या दर्जाच्या सुखसोयी देऊन सिएरा लिओनच्या अंतर्गत भागाला ब्रिटिश संरक्षित असा खालचा दर्जा दिला आणि इथूनच जनक्षोभाची ठिणगी पडली.

sunitpotnis94@gmail.com