– डॉ. यश वेलणकर

विनोद आणि त्यामुळे येणारे हसू हे चिंता, उदासी आणि तणाव काही काळ कमी करीत असल्याने १९८७ मध्ये ‘अमेरिकन असोसिएशन फॉर थेराप्युटिक ह्य़ुमर’ अशी संस्था स्थापन झाली. १९८८ मध्ये अशाच प्रकारची आंतरराष्ट्रीय संस्थादेखील काम करू लागली. त्यांच्यामार्फत या विषयातील शेकडो तज्ज्ञ एकत्र येऊन या विषयावर आपले शोधनिबंध वाचतात. विनोद आणि हास्य यांमध्ये फरक आहे. विनोद समजला तरच हसू येते. म्हणजे त्यामध्ये आकलन महत्त्वाचे असते. गप्पागोष्टी करीत असताना एखाद्याने विनोद सांगितला की काहीजण दोन वेळा हसतात. पहिले हास्य हे अन्य मित्र आपल्याला हसू नयेत यासाठी असते. नंतर मेंदूची टय़ूब पेटते, विनोद समजतो आणि प्रतिक्षिप्त क्रियेने पुन्हा हसू येते. त्यामुळे ‘श्वास सोडताना चेहऱ्याच्या स्नायूंची झालेली प्रतिक्षिप्त हालचाल’ अशी नैसर्गिक हास्याची व्याख्या ‘एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका’मध्ये आहे.

गुदगुल्या झाल्या की असे तात्काळ हसू येते. बोट लावीन तेथे गुदगुल्या होत असल्या तरी हे बोट दुसऱ्याचे असावे लागते. स्वत:ला गुदगुल्या करता येत नाहीत याचे कारणही मेंदूत आहे. शरीराला स्पर्श झाल्याने काही संवेदना निर्माण होतात; त्यांना मज्जारज्जूच्या पातळीवर निर्माण झालेली प्रतिक्रिया म्हणजे शरीराची हालचाल आणि येणारे हसू असते. माणूस स्वत: स्वत:ला बोट लावतो तेव्हा मेंदूत त्या विचाराची फाइल, म्हणजे ठरावीक न्युरॉन्सची जोडणी तयार झालेली असते. त्यामुळे बोटाचा स्पर्श समजला तरी प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून हसू येत नाही. निसर्गत: येणारे हास्य प्रतिक्षिप्त क्रिया स्वरूपात असले तरी, जाणीवपूर्वक चेहऱ्याच्या स्नायूंच्या हालचाली करून आणि मोठा आवाज काढतही हसता येते.

हास्यक्लबमध्ये ‘नारायण हास्य’ वगैरे नावे देऊन अशी अनेक प्रकारची हास्ये शिकवली जातात. सध्या जगभरात २० हजार ठिकाणी अशा प्रकारचा ‘लाफ्टरयोगा’ केला जातो. मुंबई येथील डॉ. मदन कटारिया यांनी १९९५ मध्ये पाच लोकांसमवेत याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय बंद करून पूर्ण वेळ याच विषयाचा प्रसार आणि लेखन यासाठी दिला. त्यांचे ‘लाफ्टरयोगा’ हे पुस्तक जगप्रसिद्ध झाले. जगभरातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर त्यांचे कार्यक्रम झाले. तीस मिनिटांचा हा हास्ययोग शरीराच्या स्नायूंना आणि श्वसनसंस्थेलाही व्यायाम देतो. मानसिक तणाव कमी करण्याचा जाणीवपूर्वक मोठय़ाने हसणे हा साधासोपा उपाय आहे.

yashwel@gmail.com