ग्रॅन चाको.. लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हिआ, पॅराग्वे आणि अर्जेटिना या तीन देशांमध्ये पसरलेली संवेदनशील आणि तणावग्रस्त परिसंस्था. ३,४०० वृक्ष प्रजाती, ५०० पक्षी प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या १५० प्रजाती, १२० प्रजातींचे सरपटणारे प्राणी आणि सुमारे १०० उभयचर प्रजातींच्या विपुलतेचा अधिवास असलेला हा प्रदेश. परंतु गेल्या काही वर्षांपासून शेतीचा विस्तार, रस्ते आणि इतर सुविधांसाठी होत असलेल्या मोठय़ा प्रमाणातील जंगलतोडीमुळे ही जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. इथे आढळणाऱ्या उंटसदृश दुर्मीळ ‘ग्वानॅको’ या प्राण्याचे अस्तित्वही त्यामुळे धोक्यात आले. मात्र या संपूर्ण परिसंस्थेच्या- विशेषत: ग्वानॅकोंच्या संवर्धनाचा ध्यास एका तरुण संशोधिकेने घेतला. ती तरुण संशोधिका म्हणजे- डॉ. एरिका कुइयार!

ग्वानॅको हा बोलिव्हियातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान असलेल्या ‘का-इया ग्रॅन चाको’तील सस्तन प्राण्यांच्या ७० प्रजातींपैकी एक वन्यप्राणी. परंतु जंगलतोडीमुळे ग्वानॅकोंचे अस्तित्व धोक्यात आले. या प्रजातीबरोबरच बिबटे, चित्ते या सस्तन प्रजातींच्याही अस्तित्वाला धोका निर्माण झाला.

या ग्वानॅकोंचे संरक्षण आणि संवर्धन करता करता एरिकाने संपूर्ण ग्रॅन चाको परिसंस्थेच्याच संवर्धनाचा ध्यास घेतला. आतापर्यंत आयुष्यातील २० वर्षे तिने ग्रॅन चाको आणि ग्वानॅको यांच्या संवर्धनासाठी दिली आहेत. या १० लाख चौरस कि.मी.च्या विस्तीर्ण प्रदेशात तिने संवर्धनकार्य सुरू केले, तेव्हा अनेक अडथळ्यांना तिला तोंड द्यावे लागले. तिचे हे संवर्धनकार्य अनेकांना बघवत नव्हते. परंतु ती नेटाने लढत राहिली. या कार्यात एरिकाने स्थानिक महिलांची साथ घेतली, त्यासाठी तिने त्यांना प्रशिक्षित करण्यास सुरुवात केली. आता अनेक तरुणी एरिकाने सुरू केलेल्या या संवर्धनकार्यात सहभागी होत आहेत. एरिकाच्या अथक प्रयत्नांमुळे स्थानिक मंडळींकडून ग्वानॅकोंची केली जाणारी शिकार पूर्णपणे थांबली आहे. त्यामुळे ग्वानॅकोंच्या संवर्धनात ठळक यश मिळाल्याचे दिसले. या प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम झाल्याची कबुलीही अनेक जीवशास्त्रज्ञ देत आहेत. एरिकाच्या या अतुलनीय कामगिरीमुळे तिला २०१२ साली अत्यंत प्रतिष्ठेच्या रोलेक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता एरिकाचे पुढचे लक्ष्य आहे- येथील वृक्षतोड थांबविणे. बोलिव्हिआ, पॅराग्वे आणि अर्जेटिना हे तीन देश संवर्धनासाठी एकत्र येतील तेव्हाच संपूर्ण ग्रॅन चाको संवर्धित होईल, हा आशावाद जोपासत एरिका त्या दिशेने कार्यरत आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org