या लेखात जादूचे बेरीज चौरस बनविण्याच्या खास रीती पाहूया. प्रथम पाहू विषम घरांचे जादूचे चौरस, उदा. ३७३ चौरस बनविण्याची पायरी पद्धत, जिला सायमन द ला लुबेरे पद्धत असेही नाव आहे.

प्रथम आपण क्रमवार

१ ते ९ नैसर्गिक संख्यांचा जादूचा चौरस तयार करू. याकरिता मधला अंक ५ घ्यावा. सर्वांत लहान संख्या १ मधल्या स्तंभाच्या वरच्या घरात भरा. नंतर उजवीकडे वर जाणारा तिरका बाण वापरावा. १ च्या उजवीकडे वर जाणारा बाण तिसऱ्या स्तंभाच्या वर जातो, म्हणून तिसऱ्या स्तंभातील शेवटच्या घरात २ भरा. पुन्हा खालून उजवीकडे गेल्यास बाण दुसऱ्या रांगेत जातो म्हणून त्याच दुसऱ्या ओळीत शेवटच्या घरात ३ भरा. त्यापुढचा बाण १ ने भरलेल्या घरात जाईल म्हणून ४ ही संख्या ३ च्या खालच्या घरात भरा. अशा रीतीने बाकीचे अंक आकृती १ मध्ये दाखवलेल्या बाणांच्या दिशांप्रमाणे भरा. (स्वामी भारतीकृष्ण तीर्थजी यांच्या वैदिक गणितात या पद्धतीसाठी ‘परावत्र्य योजयेत्’ असे सूत्र आहे.)

समान फरक असलेल्या कोणत्याही ९ परिमेय संख्या घेऊनही असा चौरस बनवता येईल. काही चौरस लगतच्या दोन संख्यांमध्ये समान फरक नसूनही तयार होतात. १५,१६,१७,२२,२३,२४,

२९,३०,३१ या नऊ संख्या घेऊन जादूचा चौरस बनवता येतो का पाहा.

सम घरांचे जादूचे चौरस उदाहरणार्थ, ४७४ चौरस करण्याची कॉन्स्टॅन्टिनोपलच्या मॉस्कोपुलस यांची सुधारित सोपी पुढील रीत लोकप्रिय आहे.

१ ते १६ संख्या क्रमाने घेऊन एक चौरस (आकृती २-अ) दिला आहे. या चौरसातला मुख्य चौरस आणि मधला चौरस यांच्या कर्णांच्या टोकांशी असलेल्या संख्यांची फक्त अदलाबदल करावयाची इतकेच!  कसे ते बाणांच्या साहाय्याने दाखवले आहे. (आकृती २-ब) आता आपल्याला ३४ बेरजेचा जादूचा चौरस मिळेल. (आकृती २-क) याशिवाय ठिपक्यांच्या रांगोळीची पद्धत, बुद्धिबळातील घोडा, उंट, हत्ती यांच्या चालींचे मिश्रण करून केलेली पद्धत, भारतीय ठक्कुरा फेरू यांची अनोखी मनोरंजक पद्धत अशा कितीतरी पद्धती आहेत.

–   नीलिमा मोकाशी

मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

ईमेल : office@mavipamumbai.org