– डॉ. यश वेलणकर

आयुष्याच्या प्रवासात दिशा ठरवणे म्हणजे ‘मूल्य’ आणि कुठपर्यंत पोहोचायचे हे ‘ध्येय’ होय. मूल्य ठरवणे म्हणजे ठरावीक काळ आपल्या आयुष्याच्या गाडीला फलक लावणे. अगदी बसगाडीसारखेच हे. समजा, ‘पुणे-कोल्हापूर’ हा फलक लावलेल्या बसमध्ये एखादा मुंबईला जाऊ इच्छिणारा प्रवासी चढला तर त्या बसमधील वाहक त्याला ही बस तिकडे जाणार नाही असे सांगेल. पण समजा, गाडीला कोणताच फलक लावलेला नाही; येईल त्या प्रत्येक प्रवाशाचे ऐकायचे व त्या दिशेला जायचे असे चालकाने ठरवले आणि रस्त्यात हात दाखवील त्या प्रवाशाला तो बसमध्ये घेत राहिला, तर तो एका दिशेने दूरचा प्रवास करू शकणार नाही. मूल्ये निश्चित केली नाहीत तर माणसाचेही असेच होते. मूल्य म्हणजे ठरावीक काळ आपण कोणत्या दिशेला जाणार हे ठरवणे आणि प्रवासी म्हणजे मनात येणारे विचार होत.

मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराला महत्त्व देऊन त्याचे म्हणणे आपण मानत गेलो तर गोंधळ उडतो. उदाहरणार्थ, ‘नवीन ओळखी करणे’ हे आपण मूल्य ठरवले. अशी संधी देणारा एखादा कार्यक्रम असतो; पण त्या वेळी ‘घरी बसून आराम करू या’ असा विचार मनात येतो. या वेळी मूल्य निश्चित असेल, तर या विचाराला दुसऱ्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशासारखे महत्त्व न देता ती व्यक्ती कार्यक्रमाला जाईल. हे शक्य होण्यासाठी मनात येणारे विचार- उपयोगी की निरुपयोगी, या निकषावर तोलायचे. ठरवलेल्या मूल्यांच्या दिशेने जाणारे विचार हे उपयोगी, त्यांना महत्त्व द्यायचे, ते कृतीत आणायचे. मूल्यांच्या दिशेने न जाणारे अन्य सारे विचार हे निरुपयोगी, त्यांना महत्त्व द्यायचे नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे.

हे साक्षीभावाच्या सरावाने शक्य होते. या सरावात मनातील विचारांकडे त्यांच्यापासून अलग होऊन पाहण्याचे कौशल्य विकसित होते. त्यामुळे साऱ्या विचारांचे हुकूम पाळण्याची गरज राहात नाही. येथे मूल्ये म्हणजे जीवनमूल्ये नाहीत. कोणतेही काम आपण का करतो, या प्रश्नाचे उत्तर म्हणजे मूल्य होय. काही वेळा माणसाच्या मनात दोन मूल्यांचा संघर्ष होऊ शकतो. सुट्टीत नातेसंबंध जपण्यासाठी स्वत:च्या गावी जायचे की नवीन अनुभव घेण्यासाठी अन्यत्र पर्यटनाला जायचे, असा गोंधळ उडू शकतो. स्वत:चे मूल्य निश्चित करता आले, की असे निर्णय घेणे सोपे जाते.

yashwel@gmail.com