गेल्या काही दशकांमध्ये निसर्ग व पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी सर्वसामान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण झालेली दिसते. त्यामुळेच अशाश्वत, पर्यावरणाला हानी पोहोचवण्याची क्षमता असलेल्या विकासात्मक प्रकल्पांच्या विरोधात विविध प्रकारची आंदोलने संघटितपणे उभी राहिलेली दिसतात. विख्यात अमेरिकी वन्यजीव शास्त्रज्ञ रेचेल कार्सन यांनी लिहिलेले ‘सायलेंट स्प्रिंग’ हे पुस्तक १९६२ साली प्रकशित झाले आणि या पुस्तकाच्या प्रभावात आधुनिक काळातील पर्यावरणविषयक चळवळी उदयास आल्या.

परंतु तब्बल ५७० वर्षांपूर्वीच भारतातल्या मारवाड प्रांतात गुरू जम्भेश्वर किंवा जाम्भोजी या नावाने प्रसिद्ध झालेल्या महान भारतीय संतांनी निसर्गाचे संरक्षण करण्याची शिकवण दिली होती.

उपलब्ध संदर्भानुसार, गुरू जम्भेश्वर यांचा जन्म इ.स. १४५१ साली झाला. बाल्यावस्थेत ते सदैव विचारमग्न व अंतर्मुख असत. गावातील गाईगुरांना चरायला घेऊन जाऊन निसर्गात रममाण होणे, हा त्यांचा रोजचा दिनक्रम असे. यातूनच त्यांचे निसर्गप्रेम वाढीला लागले असावे. हे गुरू जाम्भोजी अत्यंत प्रतिभाशाली संत होते. वयाच्या ३४ व्या वर्षी त्यांनी आपल्या प्रतिभेच्या आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाच्या जोरावर लोकांना उपदेश देण्यास  सुरुवात केली. सन १४८५ मध्ये मारवाड प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. दुष्काळपीडित जनता तो प्रांत सोडून जाण्याची तयारी करू लागली. परंतु जम्भेश्वरांनी त्यांना उपलब्ध नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करण्याच्या दृष्टीने सर्व प्रकारचे साहाय्य आणि मार्गदर्शन केले. त्यांचे विचार ते काव्यमय रचनेत मांडत. त्यास ‘शब्दवाणी’ असे म्हटले जाते. मारवाड प्रांतातील जनसामान्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी त्यांनी २९ मार्गदर्शक तत्त्वे सांगितली. ही तत्त्वे अनुसरणाऱ्या मंडळींना एकत्र करून ‘बिष्णोई’ (बिश म्हणजे २० + नोई म्हणजे नऊ) पंथाची स्थापना त्यांनी केली.

निसर्गातील सर्व घटकांवर मनापासून प्रेम करा आणि त्यांच्या रक्षणासाठी, संवर्धनासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावा, ही मूलभूत शिकवण त्यांनी रुजवली. खेजडी (प्रोसोपिस सिनेरेरिया अर्थात शमी/शबरी) हा वृक्ष बिष्णोई पवित्र मानतात. इतके की, १७३० साली राजस्थानच्या जोधपूरमधील खेजडली गावात या वृक्षाच्या रक्षणासाठी तब्बल ३६३ बिष्णोईंनी प्राणांचे बलिदान दिले होते. एक प्रकारे २९० वर्षांपूर्वी केले गेलेले हे ‘चिपको आंदोलन’च होते. आजही बिष्णोई पंथ जम्भेश्वरांची शिकवण आपल्या दैनंदिन व्यवहारात तंतोतंत पाळतो आहे. हरियाणाच्या हिसारमध्ये जम्भेश्वरांच्या नावे विज्ञान-तंत्रज्ञान विद्यापीठही स्थापन झाले आहे.

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org