डॉ. श्रुती पानसे

स्वस्थता ही भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. पण ती फार वेळ टिकत नसते. ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अवस्थेत हे घडतं. सर्व धर्माच्या आध्यात्मिक अवस्थेत ही स्वस्थता उल्लेखलेली आहे. त्याचे वेगवेगळे मार्गही सांगितलेले आहेत.

याचाच अर्थ फार फार पूर्वीपासून अस्वस्थतेचं देणं मानवी मनाला होतंच. पूर्वी सगळीकडे निसर्ग, हिरवाई, वातावरणात एक प्रकारची शांतता होती, तरीही ‘मना’ची – आपण शब्द वापरूया की, ‘भावनिक मेंदू’ची-  अस्वस्थता त्या काळातही होती. या अस्वस्थतेवर मात करण्यासाठी वेगवेगळे मार्ग सुचवले गेले.

कधी ध्यान, कधी प्रार्थना, प्रसन्न सुगंधी फुलापानांनी पूजा, कधी सगुण साकार तर कधी निर्गुण निराकार स्वरूप निवडलं गेलं. काही करून हे मन स्वस्थ झालं पाहिजे, ही इच्छा! ‘त्या कर्त्यां-करवित्या’वर मानसिक ओझं टाकलं गेलं की काही काळापुरती अस्वस्थता जाते. हलकं वाटतं. बरं वाटतं. त्याच्या सहवासात समाधानी वाटतं. असं असेल तर ती अवस्था रोज अनुभवायची. पहाटेच्या ताज्या वातावरणात आणि पुन्हा संध्याकाळी. कधी दिवसातून पाच वेळा, तर कधी जेव्हा मन जड होईल तेव्हा कन्फेशन करून.

अस्वस्थता हीदेखील भावनिक मेंदूची एक अवस्था आहे. ती प्रयत्नांनी घालवावी लागते. ज्याची त्याला घालवावी लागते. मनोरंजनासाठी आसपास कितीही साधनं असली तरी ती काही काळापुरतीच असतात. त्यामुळे आपण आपलीच स्वस्थता शोधावी लागते.

लहान मुलांनाही अस्वस्थता येते. आपल्याला नक्की काय होतं आहे, हे त्यांना समजत नाही. हे सर्व व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेशी शब्दसंपत्तीही नसते. अशा वेळी चिडून, रडून, उगाच किरकिर करून ती अस्वस्थता व्यक्त करतात. खाणं झालं, एक झोप झाली की पुन्हा तरतरीत होतात. शांत होतात.

आपल्याला कधी राग येतो, कधी वाईट वाटतं, या सगळ्याच्या मुळाशी असते ती अस्वस्थता. मेंदूतली रसायनं संतुलित अवस्थेत असली तर या अस्वस्थतेलाही वळवता येतं. शांत करता येतं. एकाच परिस्थितीत कधी राग येतो, कधी येतच नाही. जेव्हा येत नाही तेव्हा रसायनं ठीकठाक काम करत असतात. आहार व्यवस्थित असतो. असं होत नाही तेव्हा पित्त खवळलेलं असतं. आपल्यातल्या अस्वस्थतेचं मूळ आपणच शोधून काढलेलं बरं!

contact@shrutipanse.com