26 November 2020

News Flash

कुतूहल : ई-कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया

जवळपास ९० टक्के ई-कचरा अनधिकृतपणे ‘रिसायकल’ केला जातो

(संग्रहित छायाचित्र)

 

‘कचरा’ म्हणून फेकून दिलेल्या ई-उपकरणांचे ‘रिसायकलिंग’ (पुनर्प्रक्रिया) करता येते. खराब झालेली उपकरणे पुन्हा ‘नवीन’ करता येतात. परंतु भारतात कचरानिर्मिती आणि ‘रिसायकलिंग’साठी अधिकृतरीत्या उपलब्ध असलेली यंत्रणा यांचे प्रमाण अतिशय व्यस्त आहे. ‘रिसायकलिंग’साठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नाही असे नाही. पण हे तंत्रज्ञान वापरण्यासाठी येणारा खर्च, सरकारी परवानग्या हे संबंधितांना कष्टप्रद वाटते. त्यामुळे कोटय़वधी रुपयांची अनधिकृत उलाढाल असलेल्या ई-उपकरणांचे ‘रिसायकलिंग’ (?) करण्याचा ‘व्यवसाय’ तेजीत आहे आणि हे पर्यावरण व मानवी आरोग्याला अतिशय हानीकारक ठरते आहे. संगणकांचे सुटे भाग हाताळणाऱ्या स्त्रिया, हातोडीने संगणक फोडून त्यातले भाग हाताने वेगळे करणारे कामगार, हे चित्र सीलमपूर, मुंबई, चेन्नई व बेंगळूरु या शहरांमध्ये मोठय़ा प्रमाणात दिसते. जवळपास ९० टक्के ई-कचरा अनधिकृतपणे ‘रिसायकल’ केला जातो. केंद्र सरकारने ‘ई-कचरा (हाताळणी व व्यवस्थापन) नियम’ २०११ मध्ये जारी केले, त्यात २०१६ व २०१८ मध्ये दुरुस्त्या करण्यात आल्या आणि याद्वारे कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.

अलीकडच्या काळात व्यक्तिगत पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर घराघरांतून ई-कचऱ्याचे संकलन करून हा कचरा अधिकृत पुनर्प्रक्रिया केंद्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सेवाभावी संस्था तसेच शाळा-महाविद्यालये पुढाकार घेताना दिसतात. भोपाळ महापालिका आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे ई-कचऱ्याचे शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलन करणे, पुनप्र्रक्रिया करणे यासाठी यंदा जानेवारीत भारतातल्या पहिल्या ‘ई-वेस्ट क्लिनिक’ची स्थापना केली आहे.

अक्षय राजपूरकर या मुंबईतील कलाकाराने भेंडी बाजार-चोर बाजार अक्षरश: पिंजून काढला. तिथून संगणक, मोबाइल व तत्सम ई-उपकरणांच्या कचऱ्यातून मायक्रोचिप, बटणे आणि असे असंख्य सूक्ष्म भाग गोळा करून त्याने मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (टी-२) अंतर्गत सजावटीचा भाग म्हणून मुंबईचा नकाशा असलेले एक प्रचंड भित्तिशिल्प साकारले आहे. मुंबईच्याच हरीबाबू नटेसन या तरुणाने ई-उपकरणांच्या कचऱ्यातून अप्रतिम शिल्पे उभी केली आहेत. जपानमध्ये या वर्षी नियोजित केलेल्या ऑलिम्पिक स्पर्धा करोना महासाथीमुळे पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी या स्पर्धासाठी ७८,९८५ टन एवढय़ा ई-कचऱ्यातून ३२ किलो सोने, ३,५०० किलो चांदी आणि २,२०० किलो कांस्य काढण्यात आले असून, विजेत्यांसाठी यातून पदके बनविण्यात आली आहेत!

एकंदरीतच पर्यावरणाच्या हानीची तीव्रता काही अंशी कमी करण्यासाठी ई-कचऱ्याचा भस्मासुर नष्ट व्हावा या हेतूने असे विविध अभिनव उपक्रम अमलात आणले जात आहेत, हे चित्र निश्चितच आशादायी आहे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 20, 2020 12:06 am

Web Title: article on e waste recycling abn 97
Next Stories
1 मनोवेध : नाटकी व्यक्तिमत्त्व
2 कुतूहल : ई-कचऱ्याचा प्रवास..
3 मनोवेध : रूपांतरण समस्या
Just Now!
X