– डॉ. यश वेलणकर

तारुण्यात निद्रानाश हे चिंता, उदासीचे सौम्य लक्षण आहे. याच आजाराच्या तीव्र अवस्थेत आत्महत्या होतात. जगभरात वर्षांला साधारण आठ लाख लोक आत्महत्या करतात. यातील ३० टक्के आत्महत्या भारतात होतात. यामध्ये अयशस्वी आत्महत्या मोजलेल्या नाहीत हे लक्षात घेतले, की ही साथ किती भयंकर आहे हे लक्षात येते. ती आटोक्यात आणायची असेल तर ‘भावनांची सजगता’ या विषयाला शालेय वयापासून महत्त्व द्यायला हवे. औदासीन्य आजारात आत्महत्या होतात हे खरे असले, तरी शाळकरी मुले क्षुल्लक कारणांनीदेखील आत्महत्या करतात. ६० टक्के आत्महत्या पंचविशी गाठण्यापूर्वी होतात, असे जगभरात दिसून येते. कार्टून पाहायला न दिल्याने वा मोबाइल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणाऱ्या मुलांचे प्रमाण आपल्या देशातही वाढते आहे. त्यामुळे तात्कालिक प्रतिक्रिया करीत न राहता या समस्येकडे गांभीर्याने पाहायला हवे.

आत्महत्या केलेल्या व्यक्तीविषयी करुणा वाटू शकते; पण आत्महत्या या कृतीचे उदात्तीकरण होत नाही ना, याचीही काळजी समाज म्हणून आपण घ्यायला हवी. अन्यथा त्या व्यक्तीला मिळणारी प्रसिद्धी आणि सहानुभूती यामुळे त्या कृतीचे मनात सुप्त आकर्षण निर्माण होऊ शकते. आत्महत्या करायला धाडस आवश्यक असते हे खरे आहे; पण खून आणि बलात्कार करायलाही धाडस लागते. भावना तीव्र होतात तेव्हा असे धाडस येते. राग तीव्र असतो त्या वेळी खून होतो, तशीच आत्महत्याही होते. मुले राग अनावर झाल्यानेच आत्महत्या करतात. वासना तीव्र असते त्या वेळी बलात्कार होतो. आयुष्य निर्थक आहे, भविष्य भयंकर आहे अशी भावना तीव्र होते, त्या वेळीही आत्महत्या होते. बलात्कार किंवा खुनाचे कृत्य जेवढे निंदनीय आहे, तेवढीच आत्महत्याही निंदनीय आहे, हे पुन:पुन्हा मनाला सांगायला हवे.

एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केली की, माणसे काही काळ त्याविषयी चर्चा करतात, एकमेकांशी बोलायला हवे असे समाजमाध्यमांवर सल्ले देतात आणि काही काळ गेल्यावरहे सारे विसरून जातात. ही समस्या कमी करण्यासाठी अधिकाधिक माणसांनी ‘भावनिक सजगता’ या विषयाचा प्रसार करायला हवा आणि या सजगतेची सुरुवात स्वत:पासून करायला हवी.

yashwel@gmail.com