19 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : भावनिक बुद्धिमत्ता

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चार पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत. ते वाचून असं वाटेल की हे सगळं आपण नेहमीच करतो.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. श्रुती पानसे

भावना या बऱ्याचदा बाह्य़ परिस्थितीवर अवलंबून असतात. पण त्यांचं नियमन आपल्याकडे घ्यावं. यावर एक महत्त्वाचं संशोधन डॅनिअल गोलमन यांनी केलं आहे. त्यांनी अभ्यासलेल्या केसेसमधून जे हाती आलं त्यातून त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा विषय नीट समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘इमोशनल इंटेलिजन्स’ या नावाचं पुस्तक लिहिलं आहे.

या पुस्तकात डॅनिअल गोलमन बुद्धी, भावना आणि यशाचा संबंध उलगडून दाखवतात. त्यांच्या मते – माणूस हा भावनांच्या भरात काहीही करू शकतो. बुद्धिमान समजल्या गेलेल्या माणसांच्या हातूनही भावनिक चुका होतात. अशा चुका यशाचं रूपांतर अपयशात करू शकतात. म्हणून आपल्या भावना हुशारीने, बुद्धीच्या साह्याने हाताळल्या पाहिजेत. आपल्याला हव्या त्या पद्धतीने भावनांचं नियमन करता येतं. त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. पण ते जमू शकतं.

योग्य प्रयत्नाने, स्वत:ला भावनिकदृष्टय़ा समर्थ करता येतं. आपल्या नकारात्मक भावनांवर मात करून सकारात्मक भावना वाढवता आल्या की व्यक्ती जीवनात यशस्वी होते. म्हणून ते म्हणतात, केवळ बुद्धय़ांकाला काहीच महत्त्व नाही. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आपला भावनांक महत्त्वाचा आहे. बुद्धय़ांक वरच्या पातळीवर असेल, परंतु भावनांक कमी असेल तर अशांचं जीवनात यशस्वी होण्याचं प्रमाण कमी असतं.

भावनिक बुद्धिमत्ता वाढवण्यासाठी चार पायऱ्या त्यांनी सांगितल्या आहेत. ते वाचून असं वाटेल की हे सगळं आपण नेहमीच करतो. मात्र खोलात शिरून स्वत:ची चाचपणी केली की सुधारणा नेमकी कुठे करायची आहे, हे नीट लक्षात येतं.

ज्या वेळेस पालक वा शिक्षक म्हणून आपल्याला आपल्या भावना ओळखता येतील त्या वेळेस आपण मुलांच्याही भावना ओळखू शकू.

या पुढील भागात आपण भावनिक बुद्धिमत्तेचा सिद्धांत समजून घेऊ. सिद्धांत समजला की त्याप्रमाणे लगेच वागण्यात बदल होईल असं नाही. तसंच हे काम कदाचित झट की पट होणार नाही. स्वत:ला थोडा वेळ द्यावा लागेल. स्वत:वर काम करावं लागेल. मात्र यात फायदा आहेच. आपला आणि आपल्या जवळच्यांचाही !

contact@shrutipanse.co

First Published on May 8, 2019 12:10 am

Web Title: article on emotional intelligence