19 October 2019

News Flash

मेंदूशी मैत्री : भावनांच्या लाटा

भावना या विषयावर नव्या मेंदूसंशोधनाने बराच प्रकाश टाकला आहे

(संग्रहित छायाचित्र)

भावना या विषयावर नव्या मेंदूसंशोधनाने बराच प्रकाश टाकला आहे. या संदर्भात मेंदूच्या कार्यपद्धतीचा विचार केला तर असं दिसतं की, मेंदूच्या रचनेत भावनेचं एक विशिष्ट क्षेत्र आहे. आपल्या भावनांना एक वेगळी जागा दिलेली आहे. ही जागा म्हणजेच लिंबिक सिस्टीम. आनंद, भीती, दु:ख, प्रेम अशा वेगवेगळ्या छटा इथे निर्माण होतात. बाहेरची परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल झाली की त्यानुसार आपोआप भावना निर्माण होतात.

आपल्या मेंदूमध्ये कायम भावनांचा खेळ चालू असतो. ‘भावनांकडे लक्ष न देता बुद्धीने निर्णय घ्यायला पाहिजेत’, ‘भावनांच्या आहारी जाऊ नये’ अशा शब्दांत भावनांची कितीही संभावना केली, भावनांना कमी आणि बुद्धिमत्तेला जास्त माप दिलं तरी भावना या काही केल्या कमी होत नाहीत. व्यक्तिगत भावना आणि समाज म्हणूनही. भारतीयांच्या बाबतीत तर हा समाज बुद्धीपेक्षा भावनांना जास्त महत्त्व देतो, असं बोललं जातं. आणि म्हणूनच आपल्यात संशोधक वृत्ती कमी आहे की काय? भावनिक लाटा मात्र सगळीकडे दिसून येतात – आपल्या लग्नसोहळ्यांपासून ते निवडणुकीतल्या लाटांपर्यंत. डोक्याने काही काम करण्यापेक्षा आपली तरुणाई नाक्यावरच्या दादासमोर का झुकते,  याचा विचार व्हायला हवा.

भावना निर्माण झाल्या की त्या व्यक्त करण्यासाठी या सिस्टीमकडे मेंदू रक्तप्रवाह पुरवतो. म्हणजे समजा, अचानक आपली आवडती मत्रीण दिसली की, आपण हसतो, हात हातात घेतो. आपल्याला आनंद होतो. अशा क्रिया करण्यासाठी रक्तप्रवाह लिंबिक सिस्टीमकडे असावा लागतो.

या उलट आपल्याला दु:ख झालं की आपल्या डोळ्यात पाणी येतं. निराशा दाटून येते. जिथे आहोत तिथून दूर निघून जाण्याचा आपण प्रयत्न करतो. यासाठीसुद्धा रक्तपुरवठा लिंबिक सिस्टीमकडेच असावा लागतो. राग येतो तेव्हा काय काय घडतं? आपला चेहरा रागीट होतो. रागाने लाल होतो. आवाज वाढतो. हाता-पायाला कंप सुटतो. ठोके वाढतात. भावना उचंबळून आल्यामुळे शरीरांतर्गत बदलाचा परिणाम बाहेर दिसून येतो.

भावना आणि बुद्धी यांची सांगड घालून निर्णय घ्यायला पाहिजेत, तशी सवय लावून घ्यावी लागते. नाही तर तराजूचं पारडं एकीकडेच झुकतं. आपण भावनिकदृष्टय़ा समर्थ आहोत की नाही, हे यावरून समजतं.

contact@shrutipanse.com

First Published on May 7, 2019 12:03 am

Web Title: article on emotional waves