03 June 2020

News Flash

कुतूहल : लुप्तप्राय प्रजाती दिवस

आज- १५ मे रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या निमित्ताने संकटग्रस्त प्रजातींना वाचविण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निश्चय करू या!

माळढोक.. भारतातील अत्यंत संकटग्रस्त पक्षी.

 

भारत हा अतिशय विपुल आणि समृद्ध जैवविविधता असणाऱ्या देशांपैकी एक आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये विकासात्मक प्रकल्प राबविण्यासाठी करण्यात आलेली वारेमाप जंगलतोड, त्या अनुषंगाने उद्ध्वस्त होत असलेले वन्य प्राण्यांचे अधिवास, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींचे वाढलेले प्रमाण अशा विविध कारणांमुळे या जैवविविधतेचा मोठय़ा प्रमाणात विनाश होतो आहे. आज अस्तित्वात असलेल्या अनेक प्रजातींची संख्या झपाटय़ाने कमी होत चालली आहे. जर त्यांच्या संवर्धनासाठी तातडीने पावले उचलली नाहीत, तर अगदी नजीकच्या भविष्यात त्या पृथ्वीवरून पूर्णपणे नामशेष होतील.

या पार्श्वभूमीवर, जगभरात सर्वसामान्य लोकांपर्यंत- या संकटग्रस्त आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजाती कोणत्या आहेत, त्यांचे मानवी अस्तित्वासाठी असलेले योगदान किती महत्त्वाचे आहे, आदी माहिती प्रभावीपणे पोहोचावी आणि या प्रजातींना नामशेष होण्यापासून वाचवणे आणि पुढे त्यांचे संवर्धन करणे या कार्यात सहभाग मिळवावा यासाठी २००६ सालापासून अमेरिकेत आणि जगभरात प्रत्येक वर्षी मे महिन्यातील तिसऱ्या शुक्रवारी ‘लुप्तप्राय / संकटग्रस्त प्रजाती दिवस’ साजरा केला जातो.

यानिमित्ताने संकटग्रस्त प्रजाती वाचवण्यासाठी आपण पुढील कृती करू शकतो : (१) सर्वप्रथम आपल्या भागात संकटात सापडलेल्या प्रजाती कोणत्या आहेत, याची माहिती घेणे. (२) त्यांच्या लुप्तप्राय होण्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करणे. (३) त्या प्रजातींना योग्य असे पर्यावरण उपलब्ध करून देणे. उदा. फुलपाखरे, मधमाशा यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांना आवश्यक असणाऱ्या स्थानिक वनस्पतींची बाग तयार करणे. (४) तृणनाशक, कीटकनाशक तसेच रासायनिक खतांचा वापर टाळणे. (५) आपल्या दैनंदिन जीवनात जास्तीत जास्त वस्तूंचा पुनर्वापर करणे. (६) अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, प्राण्यांच्या अवयवांपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे पूर्णपणे बंद करणे आणि जर अशा वस्तू बनवताना/ विकताना कोणी आढळल्यास त्याच्याविरुद्ध तक्रार करणे. (७) प्रत्येकाने आपापल्या शहरात, गावात अशा विषयांवर कार्य करणाऱ्या संस्थांची माहिती मिळवून त्यांच्या कार्यात सहभागी होणे, आदी.

आज- १५ मे रोजी साजरा होणाऱ्या या दिवसाच्या निमित्ताने संकटग्रस्त प्रजातींना वाचविण्याच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा निश्चय करू या!

– रुपाली शाईवाले

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2020 12:06 am

Web Title: article on endangered species day abn 97
Next Stories
1 मनोवेध : वैचारिक भावना
2 कुतूहल : प्राण्यांमधील परहितनिष्ठा
3 मनोवेध : भावनांच्या पातळ्या
Just Now!
X