16 January 2021

News Flash

कुतूहल : पंधराव्या वर्षांतला पर्यावरण जागर!

वाचकहो, ‘कुतूहल’ सदरात वर्ष २०२० साठी ‘पर्यावरण’ हा विषय निवडला

(संग्रहित छायाचित्र)

वाचकहो, ‘कुतूहल’ सदरात वर्ष २०२० साठी ‘पर्यावरण’ हा विषय निवडला. पर्यावरणविषयक कायदे, पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने झालेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांची माहिती, पर्यावरण बिघडवणाऱ्या आपल्या सवयी, पर्यावरण बिघडण्यासाठी निर्माण झालेली सामाजिक परिस्थिती, आपली बदललेली जीवनशैली, वाढत्या लोकसंख्येमुळे पर्यावरणाचे ढासळलेले संतुलन आणि तरी याही परिस्थितीत, क्वचित आपला जीव धोक्यात घालूनही परिस्थिती सुधारण्यासाठी काम करणाऱ्या देशी-विदेशी व्यक्ती यांची माहिती आम्ही आपल्याला या सदरातून दिली. लेखकांकडून दिलेल्या विषयावर वेळेत लेख लिहवून घेण्याची समन्वयाची कामगिरी ठाण्यातील पर्यावरण दक्षता मंडळाचे प्रा. विद्याधर वालावलकर यांनी सुरुवातीचे दोन महिने आणि नंतर याच संस्थेचे प्रा. संजय जोशी यांनी पार पाडली. प्रा. जोशी तर या काळात चार महिने कौटुंबिक कामासाठी अमेरिकेत होते आणि तरीही हे काम त्यांनी सांभाळले. तंत्रज्ञानाचा जयजयकार असो!

वस्तुत: या वर्षी संपूर्ण जगावर न भूतो न भविष्यति (?) असे करोना महामारीचे संकट मार्च महिन्यापासून ओढवले आणि अजूनही त्यातून आपली सुटका झालेली नाही. या काळात काही महिने आपल्यापर्यंत वर्तमानपत्रे पोहोचली नाहीत, पण ती छापली जात होती आणि त्याच्या छापील अथवा ई-आवृत्त्या प्रकाशित होत होत्या. सर्व व्यवहार ठप्प झाले होते, तरीही या सदराच्या सर्वच्या सर्व ४० लेखकांनी करोनाची सुट्टी न घेता आपापले लेख वेळेवर पाठवून सहकार्य केले. या ४० लेखकांपैकी निम्मे तरी लेखक नव्याने लिहू लागले असून या नवीन लेखकांचे विज्ञान प्रसारकांच्या चळवळीत स्वागत आहे. ‘मराठी विज्ञान परिषद’ चालवत असलेले ‘कुतूहल’ सदराचे हे सलग १५ वे वर्ष असून, या एकटय़ा सदराच्या निमित्ताने ‘मराठी विज्ञान परिषदे’ने १५ वर्षे प्रतिवर्ष सरासरी २० नव्याने लिहू लागलेले असे एकंदर ३०० नवलेखक निर्माण केले. ‘मराठी विज्ञान परिषद’ विज्ञानलेखक आणि वक्ते तयार करण्याचे काम गेली ५४ वर्षे अहर्निशपणे करीत आली आहे; त्यात आता ‘लोकसत्ता’चाही हातभार लागत आहे ही अभिनंदनीय बाब आहे.

वर्षभर हे सदर वाचत असताना, त्या-त्या लेखांकासंबंधी वाचकांच्या मनात आलेल्या शंका आणि काही वेळा लेखांकात उल्लेखिलेल्या संस्था अथवा व्यक्तींचे संपर्क विचारणारी पत्रे आणि दूरभाष यांची संख्या शंभराच्या वर होती. ही संख्या ‘मराठी विज्ञान परिषदे’कडच्या प्रतिसादाची आहे. या वर्षी या सदरात एकूण २६० लेख छापले गेले.

– अ. पां. देशपांडे

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 12:07 am

Web Title: article on environmental awakening for the fifteenth year abn 97
Next Stories
1 मनोवेध : व्यवहारध्यान
2 कुतूहल : दगडफुले : हवाप्रदूषणाची निर्देशक
3 कुतूहल : प्रदूषणाचे सजीव निर्देशक
Just Now!
X