पर्यावरण शास्त्र किंवा पर्यावरण अभ्यास हा काही वर्गाच्या चार भिंतींच्या आड सरळधोपट मार्गाने ठरावीक तासिकांच्या मर्यादेत शिकवण्याचा विषय नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणविषयी आपलेपणाची भावना रुजवण्यासाठी संबंधित अध्यापकानेदेखील जीव ओतून, पूर्णपणे समरस होऊन, कल्पकतेने हा विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला पाहिजे. विद्यार्थ्यांसमोर प्रश्न उभे करणे, त्यांची आपापसात चर्चा घडवून आणणे, त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्यासाठी प्रवृत्त करणे या व अशा अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे शिकवता येऊ शकतो. या शिवाय वार्षिक अभ्यास सहलीव्यतिरिक्त स्थानिक अभ्यास दौरे आयोजित करावे. याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. स्थानिक आणि विभागीय पातळीवरील पर्यावरणीय समस्यांचे आकलन करून त्या सोडविण्यासाठी लागणारी बौद्धिक, तांत्रिक व वैचारिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या तरुणांची पिढी घडविण्याची क्षमता या अभ्यासक्रमात असायला हवी.

पर्यावरण शिक्षण हे खुल्या पद्धतीने द्यायला हवे, असा एक विचार अलीकडच्या काळात रुजू पाहतो आहे. या पद्धतीमध्ये वय, शैक्षणिक पार्श्वभूमी या बाबी विचारात न घेता अशा कोणत्याही वयोगटातील, कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले किंवा नसलेले, शैक्षणिक कारकीर्दीत काही ना काही कारणांमुळे अपयशी ठरलेले अशा मुलांसाठी, तरुणांसाठी आणि इतरांसाठी  विशेष अभ्यासक्रम तयार करून त्यांना अनौपचारिक पद्धतीने पर्यावरण साक्षर करणे ही आता काळाची गरज होत चालली आहे.

पर्यावरण शास्त्र अथवा पर्यावरण अभ्यास यांचे औपचारिक शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या पर्यावरण साक्षरता मोहिमा चालवू शकतील. अशा प्रकारच्या ‘खुल्या पर्यावरण शाळा’ चालवणाऱ्या काही पर्यावरणीय स्वयंसेवी संस्था आहेत. यातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज पर्यावरण संवर्धनात मोलाची कामगिरी बजावत आहेत. आपल्या शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षणात अपयशी ठरलेले परंतु निसर्ग आणि पर्यावरणाप्रति मनापासून श्रद्धा असलेले अनेक जण आज निसर्ग आणि पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन कार्यात स्वत:ला पूर्णपणे वाहून घेतलेले दिसतात. अशाच नागरिकांची आज आपल्या पर्यावरणाला, निसर्गाला गरज आहे.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org