संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ठरवलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्याच्या दृष्टीने जगातील विविध देशांनी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काय पावले उचलली आहेत किंवा कशा प्रकारची धोरणे आखली आहेत, याचा आढावा घेण्यासाठी अमेरिकेतील येल व कोलंबिया विद्यापीठे, त्याचप्रमाणे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम व युरोपियन कमिशनचे संयुक्त संशोधन केंद्र यांनी संयुक्तपणे काही निकष ठरवून, त्याआधारे देशाच्या पर्यावरणीय कामगिरीचा निर्देशांक (एन्व्हायर्नमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स) ठरविण्याची पद्धत विकसित केली आहे. या निकषांचा आढावा दर दोन वर्षांनी घेण्यात येतो. हे निकष पर्यावरणाची सुदृढता आणि परिसंस्थांची कार्यक्षमता या दोन महत्त्वाच्या घटकांवर केंद्रित केलेले आहेत. निर्देशांक ठरविण्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या एकूण गुणांपैकी ४० टक्के गुण हे पर्यावरणाची सुदृढता आणि ६० टक्के गुण हे परिसंस्थांची कार्यक्षमता यासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. पर्यावरणाची सुदृढता या घटकासाठी हवेची गुणवत्ता, घनकचरा व्यवस्थापनातील कार्यक्षमता, सार्वजनिक स्वच्छता आणि पिण्याचे शुद्ध पाणी, इत्यादी प्रमुख निर्देशक (इंडिकेटर्स) ठरविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे परिसंस्थांची कार्यक्षमता या घटकासाठी सजीवांचे अधिवास, जैवविविधता,  विविध परिसंस्था पुरवत असलेल्या विविध प्रकारच्या सेवा, जलस्रोत, मत्स्य व्यवसाय, जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल, प्रदूषकांचे उत्सर्जन असे प्रमुख निर्देशक ठरविण्यात आले आहेत. प्रत्येक देशासाठी हे घटक आणि संबंधित सर्व निर्देशक तपासून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून गुणानुक्रमे देशांची क्रमवारी ठरविण्यात येते. ज्या देशाला सर्वाधिक गुण मिळतील, त्या देशाच्या पर्यावरणीय कामगिरीचा निर्देशांक सर्वात अधिक असतो. हा निर्देशांक जेवढा मोठा, तितकी त्या देशातील नागरिकांची पर्यावरण जागृती चांगली आणि त्यांची निसर्ग-मैत्री उत्कृष्ट दर्जाची असते. कॅनडाच्या टोरोंटो विद्यापीठातील संशोधकांनी या पद्धतीचा वापर करून काही अनुमाने काढली आहेत. त्यांच्या निर्दशनास असे आले आहे की, ज्या देशातील नागरिकांची निसर्गाप्रति असलेली अनुकंपा उच्च दर्जाची असते अशा देशांचा निसर्गरक्षणात मोठा हातभार असतो.

kasturi cotton
कस्तुरी कॉटन…देशातील सर्वोत्तम कापूस!
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Industrial production rate advanced 5.7 percent in February
औद्योगिक उत्पादन दर फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे
india chiana Meeting in Beijing on India China border dispute
भारत-चीन सीमावादावर बीजिंगमध्ये बैठक; परराष्ट्र मंत्रालयाच्या माध्यमातून शांतता प्रस्थापित करण्यावर सहमती

२००६ साली पहिला पर्यावरणीय कामगिरी निर्देशांक प्रसिद्ध करण्यात आला. दर दोन वर्षांनी हा निर्देशांक प्रसिद्ध करण्यात येतो. २०१२ सालच्या निर्देशांकात १३२ देशांपैकी भारत १२५व्या क्रमांकावर होता, तर दोन वर्षांत कामगिरी सुधारूनही २०१४ साली १७८ देशांतून भारत क्रमवारीत १५५व्या स्थानावर आला होता. मात्र पुढे २०१६च्या निर्देशांकात पर्यावरणीय आघाडीवर आपली कामगिरी इतकी बिघडली की, भारत १८० देशांत १७७व्या स्थानी पोहोचला. २०१८च्या निर्देशांकात जगातील १८० देशांमध्ये भारताचा क्रमांक १७२वा; तर यंदाच्या (२०२०) पाहणीत १६८वा क्रमांक आला आहे. १८० देशांमध्ये ८२ टक्के गुण प्राप्त करून डेन्मार्क प्रथम क्रमांकावर आहे! आपण आपली कामगिरी उंचावण्यासाठी सर्वच आघाडय़ांवर प्रयत्न करण्याची गरज आहे.

– जोसेफ तुस्कानो

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org