उत्क्रांतीच्या रेटय़ामुळे पक्षी इतर प्राण्यांपेक्षा शरीररचना, मेंदूचा व्याप, हवेत उडू शकण्याची क्षमता अशा अनेक कारणांनी संपूर्णपणे वेगळे आहेत. पक्ष्यांच्या बाबतीत अंडय़ांचे रक्षण आणि पिल्लांचे संगोपन वेगळ्या पातळीवर होते. यासाठी पक्ष्यांमध्ये कामाची विभागणी अतिशय काटेकोरपणे केलेली असते. घरटे तयार करणे, अंडय़ांना उबविणे, पिल्ले उडण्यालायक होईपर्यंत त्यांना अन्न पुरविणे आणि त्यांची काळजी घेणे या गोष्टींचा त्यामध्ये समावेश असतो. साधारण ९० टक्के प्रजातींमध्ये या गोष्टी जोडीने केल्या जातात. यामध्ये मादी अंडी आणि पिल्लांना सुरक्षित ठेवण्याचे, तर नर घरटे तयार करण्याचे, अन्न पुरविण्याचे काम करतो. काही ठिकाणी केवळ नर अथवा मादी, ही जबाबदारी पार पाडताना दिसतात. परंतु शहामृगासारख्या उडू न शकणाऱ्या पक्ष्यांमध्ये संगोपनाची बरीचशी जबाबदारी नर पक्षी उचलतो.

पक्ष्यांच्या घरटय़ातील स्थापत्यकला अवाक् करणारी असते. घरटे सुरक्षित आणि हवेशीर ठिकाणी, योग्य गोष्टी वापरून सुयोग्य रचनेचे केलेले असते. घरटे नेहमी स्वच्छ ठेवले जाते. कबुतरे पिल्लांना एक प्रकारचे दूध (अन्ननलिकेत तयार होणारा पांढरा द्रव) देतात, गिधाडांसारखे पक्षी चोचीतून पाणी आणून पिल्लांची तहान भागवितात, धनेश मादी संगोपनाच्या काळात स्वत:ला घरटय़ात कोंडून घेते, एम्परर पेंग्विन नर अतिशय थंड तापमानात अन्न न घेता अंडय़ांची काळजी घेतो.. आणि सर्वच पक्षी अन्न आणण्यासाठी अनेक फेऱ्या मारतात.

सस्तन प्राण्यांतील ९५ टक्के प्रजातींमध्ये मादी पिल्लांची काळजी घेताना दिसते. संगोपन जास्त काळासाठी असते, कारण विणीचा काळ विशिष्ट असतो आणि पिल्लांची संख्यासुद्धा कमी असते. सस्तन प्राण्यांमध्ये विशिष्ट गर्भधारणा कालावधी आणि दूधनिर्मिती या दोन खास गोष्टी आढळतात. त्याबरोबरच पिल्लांना स्वच्छ करणे, त्यांना पौष्टिक अन्न देणे, सुरक्षित राहण्याची नैसर्गिक सोय करणे, सुरक्षिततेसाठी पिल्लांना तोंडात धरून, पाठीवर घेऊन, शेपटीला लोंबकळत वास्तव्याची ठिकाणे बदलणे, पिल्लांच्या शिकण्याच्या प्रयत्नांना उत्तेजन देणे, स्पर्श-गंधाने ओळखणे आणि सतत सान्निध्यात राहणे, ज्यामुळे ‘भावबंध’ निर्माण होत असावा. संगोपन व्यवस्थेची उत्क्रांती केवळ त्यातून मिळणाऱ्या फायद्यावर अवलंबून नसावी असे दिसते. परंतु हेतू एकच : प्रजातीच्या जगण्याची, उत्क्रांत होण्याची शक्यता वाढविणे. संगोपनाच्या विविध पद्धती समजून घेण्यासाठी सर्व जीव जगायला हवेत आणि त्यासाठी त्यांना योग्य पर्यावरण मिळायला हवे हे निश्चित!

– डॉ. नीलिमा कुलकर्णी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org