आपण दिवसभरात अनेकदा पिण्यासाठी पाणी वापरतो. याशिवाय आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेली प्रत्येक वस्तू, कपडे, अन्नधान्य या सर्व गोष्टींच्या उत्पादन प्रक्रियेत पाणी लागतेच. आपल्या एकंदरीत व्यवहारांत आपण पाण्याचा विनियोग कसा करतो, याचे मोजमाप म्हणजे ‘वॉटर फूटप्रिंट्स’ (पाण्याचे पाऊलठसे वा पाण्याच्या पाऊलखुणा)! उदा. कापणीनंतर एक किलो तांदूळ निघेल एवढय़ा प्रमाणात तांदळाचे पीक उगवायला तब्बल तीन हजार लिटर्स एवढे पाणी लागते. त्याचप्रमाणे एक किलो कापूस मिळवण्यासाठी तब्बल दहा हजार लिटर्स एवढे पाणी लागते. एवढय़ा कापसात एक जीन्सची पॅन्ट तयार होते. थोडक्यात, जीन्सची एक पॅन्ट अस्तित्वात येण्यासाठी किमान दहा हजार लिटर्स एवढय़ा पाण्याचा विनियोग केला जातो!

साधारणपणे पाण्याचे मोजमाप आपण ‘लिटर’ या एककात करतो. पण पाण्याचा पाऊलठसा ठरवताना ‘घनमीटर्स’ हे एकक वापरतात. वैयक्तिक पाऊलठसे मोजताना दोन प्रक्रिया विचारात घेतल्या जातात. एक म्हणजे, एखादी  व्यक्ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरीदारी शारीरिक स्वच्छतेसाठी, शाळा-महाविद्यालयांत, नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी, विविध कामांसाठी थेट नळाद्वारे किती प्रमाणात पाणी वापरते; आणि दुसरे म्हणजे, ती व्यक्ती भक्षण करीत असलेले अन्न किंवा अन्य खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी, ऊर्जास्रोतांच्या निर्मितीसाठी, वापरत असलेल्या  कपडय़ांच्या निर्मितीसाठी, घर बांधण्यासाठी, वगैरे अशा विविध स्वरूपांत किती पाणी वापरले जाते, याचे मोजमाप करण्यात येते.

भारताचा विचार करायचा झाला, तर हा ठसा दरडोई प्रतिवर्षी ९८० घनमीटर्स एवढा आहे. जागतिक पातळीवरील पाण्याच्या पाऊलठशांमध्ये आपला वाटा हा तब्बल १२ टक्के एवढा आहे! ही अतिशय गंभीर बाब आहे. भारतासारख्या विकसनशील देशाने पाण्याची उपलब्धी आणि वापर यांत निर्माण झालेल्या कमालीच्या तफावतीकडे, विषमतेकडे अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

आपण आपला पाण्याचा पाऊलठसा किती लहान अथवा मोठा आहे, हे मोजू शकता. त्यासाठी ‘द वॉटर फूटप्रिंट नेटवर्क’ या जागतिक संघटनेने एक ऑनलाइन गणकपद्धती तयार केली आहे. या संघटनेच्या संकेतस्थळावरील  https://waterfootprint.org/ en/resources/interactive-tools/personal-water-footprint calculator/ personal- calculator-extended/ या दुव्यावरून आपापल्या पाऊलखुणा मोजता येतील.

डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  office@mavipamumbai.org