28 November 2020

News Flash

कुतूहल : आर्थिक सुबत्ता आणि कचरा

कचऱ्याचे प्रमाण आणि त्यातील विविधता जेवढी जास्त, तेवढा तो परिसर अथवा ते गाव किंवा शहर समृद्ध, असा खुशाल निष्कर्ष काढावा.

(संग्रहित छायाचित्र)

 

भारतातील गावे किंवा शहरे आर्थिकदृष्टय़ा किती श्रीमंत आहेत, वैभवशाली आहेत आणि त्यांची किती प्रमाणात भरभराट झाली आहे, याचा आढावा घ्यायचा असेल तर जरा तिथल्या कचराकुंडय़ांमध्ये डोकावून पाहावे. कचऱ्याचे प्रमाण आणि त्यातील विविधता जेवढी जास्त, तेवढा तो परिसर अथवा ते गाव किंवा शहर समृद्ध, असा खुशाल निष्कर्ष काढावा. समाजातील आर्थिक सुबत्ता आणि कचरानिर्मितीचे प्रमाण हे एकमेकांशी निगडित आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यापूर्वी त्यातील विविध घटकांवर योग्य, आवश्यक ती प्रक्रिया केल्यानंतरच तो योग्य ठिकाणी टाकल्यास पर्यावरणाला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही आणि अर्थातच मानवी आरोग्याला धोका निर्माण होणार नाही. कचरा निर्मूलन आणि व्यवस्थापनाची मूलभूत जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे. महाराष्ट्रात एकूण २६२ स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्यांपैकी २६ महानगरपालिका आहेत. उर्वरित २३६ स्थानिक स्वराज्य संस्थांची लोकसंख्येनुसार अ, ब आणि क अशी वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये ‘अ’ वर्गात १३, ‘ब’ वर्गात ५७ आणि ‘क’ वर्गात १५१ नगर परिषदा समाविष्ट आहेत. त्याचप्रमाणे नऊ नगर पंचायती आणि सहा कटक मंडळे आहेत. या सर्वाचा एकत्रितरीत्या निर्माण होणारा कचरा दर दिवशी तब्बल २१,८६७.२७ मेट्रिक टन एवढा आहे. यापैकी ८६.७४ टक्के कचरा हा २६ महानगरपालिका क्षेत्रात निर्माण होतो, तर उर्वरित १३.२६ टक्के कचरा हा २३६ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात निर्माण होतो! ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आणि बोलकी आहे.

महानगर पालिकांच्या क्षेत्रांतील दिवसेंदिवस फुगत चाललेली लोकसंख्या, अफाट, अनियंत्रित पद्धतीने होत असलेली बांधकामे व अन्य विकासात्मक कामे, आर्थिक सुबत्तेमुळे लोकांनी अंगीकारलेली ‘डिस्पोजेबल’ जीवनशैली यामुळे भारतीय शहरांमध्ये कचरानिर्मितीचे प्रमाण खूप अधिक आहे. महाराष्ट्रात दर दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात एकत्रितरीत्या निर्माण होणाऱ्या २१,८६७.२७ मेट्रिक टन कचऱ्यापैकी फक्त ६,६९०.८८ मेट्रिक टन, म्हणजे केवळ ३१ टक्के कचऱ्यावरच दर दिवशी योग्य प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यात येते. उरलेल्या १५,१७६.३९ मेट्रिक टन, म्हणजे ६९ टक्के कचऱ्यावर कोणतीही प्रक्रिया न करता अशास्त्रीय पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येते. हा कचरा उघडय़ा डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. पर्यावरणावर आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर याचे गंभीर दुष्परिणाम होतात.

– डॉ. संजय जोशी

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 12:07 am

Web Title: article on financial well being and waste abn 97
Next Stories
1 कुतूहल : मानवनिर्मित कचरा
2 मनोवेध : रिकामे मन..
3 मनोवेध : ‘मी’चे गाठोडे
Just Now!
X