अलीकडच्या काळात बहुतांश लोक आपल्या मुलाबाळांसह जंगल सफारी किंवा वन पर्यटनाला जाताना एकच उद्देश ठेवतात, तो म्हणजे- वाघाला त्याच्या अधिवासात मुक्तपणे भटकंती करताना पाहणे! यात गैर काहीच नाही. वाघासारखा अतिशय देखणा, रुबाबदार प्राणी बघायला कोणाला आवडणार नाही? परंतु अनेक वेळा वाघ आपल्या वाटेवर येतच नाही. तुम्ही तिथे गेलात म्हणून वाघाने तुमच्यासमोर यावे ही अपेक्षाच चुकीची आहे. यामुळे अशा जंगल भटकंतीमध्ये समस्या उभ्या राहतात त्या पर्यटकांच्या हट्टीपणामुळे. वाघाला बघितले तरच आपले निसर्गप्रेम सिद्ध झाले, असे जणू त्यांना प्रशस्तिपत्र मिळवायचे असते की काय, कोण जाणे!

मग अशी मंडळी वेळप्रसंगी समवेत असलेल्या मार्गदर्शकावर दबाव आणतात, वाघ दिसला नाही तर कधी शिवीगाळदेखील करतात. असे वर्तन अत्यंत गैर आहे. वास्तविक जंगलात अगदी किडय़ामुंग्यांपासून ते हत्ती, नीलगाय, लांडगे, कोल्हे, रानडुकरे, चितळ, सांबर, ससे, साप या व अशा असंख्य प्राण्यांबरोबरच विविध प्रजातींचे पक्षी आणि विविध प्रकारची झाडेझुडपे, वेली ही सजीव सृष्टीदेखील तितकीच महत्त्वाची आणि अतिशय चित्तथरारक व रोमांचकारी अनुभव देणारी ठरते. या प्राण्यांना कोणत्याही प्रकारे आपला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात विहार करताना पाहणे, शक्य झाल्यास त्यांना आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करून ठेवणे हेदेखील तितकेच आनंददायी आणि विलक्षण समाधान देणारे असते.

जंगलातील वास्तव्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले मारुती चितमपल्ली, किरण पुरंदरे यांच्यासारख्या दिग्गज, निसर्गतज्ज्ञांनी वन पर्यटन कसे करावे, अरण्यवाचन कसे करावे यावर विपुल लिखाण केले आहे. वन पर्यटनाला जाताना केवळ वाघ किंवा इतर प्राण्यांच्या दर्शनासाठी नव्हे, तर समग्र जंगल दर्शनाचा अनुभव घेण्यासाठी आणि ते जंगल ‘वाचण्याचा’ प्रयत्न करण्यासाठी जावे. आपली भटकंती ही तज्ज्ञ, अनुभवी मार्गदर्शकाची साथ घेऊन केली, तर खूप काही बघायला, शिकायला, अनुभवायला मिळेल. आपला पेहराव हा निसर्गातील रंगांशी जास्तीत जास्त एकरूप होईल असा असावा. तीव्र वासाचे अत्तर लावणे टाळावे. जंगलाचे स्वर्गीय संगीतच ऐकावे. अशी भटकंती करत असताना आपल्या अस्तित्वाची चाहूलदेखील लागणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. न जाणो एखादा वन्यप्राणी सहजपणे तुमच्या नजरेस पडेल!

– प्रा. विद्याधर वालावलकर

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org