‘डीडीटी’ म्हणजे डायक्लोरो डायफेनाइल ट्रायक्लोरोइथेन. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ‘मलेरिया’वर नियंत्रण ठेवण्याच्या हेतूने डासांवर फवारण्यासाठी हे कीटकनाशक सर्रास वापरण्यास सुरुवात झाली. यातील ‘कीटकनाशक’ हा गुण हेरून अमेरिकेतील काही उद्योगपतींनी या कीटकनाशकाची निर्मिती आणि प्रसार मोठय़ा प्रमाणावर सुरू केला. मग अनेक शेतकरी या रसायनाचा वापर आपल्या शेतात फवारण्यासाठी करू लागले. अगदी सरकारी शेती खात्यानेही या रसायनाचा वापर सुरू केला. डीडीटीच्या अतिरेकी वापराने संपूर्ण जीवसृष्टीलाच धोका पोहोचू शकतो, असा सावधानतेचा इशारा अनेक शास्त्रज्ञ वेळोवेळी देत होते. पण भरघोस नफा लक्षात घेता उद्योजकांनी त्याचे उत्पादन सुरूच ठेवले. अखेर उद्योजकांच्या या मुजोरीविरोधात एक महिला जीवशास्त्रज्ञ उभी ठाकली- रॅशेल कार्सन!

नैसर्गिक घटना, माणसाने निसर्गचक्रात सुरू केलेला अनिर्बंध हस्तक्षेप आणि त्यातून घडणारे  अनैसर्गिक बदल या असंतुलनाचे धोके रॅशेल यांनी ओळखले. रसायनाच्या दुष्परिणामांबाबत अनेक पुरावे गोळा करत त्यांनी लेखन सुरू केले. हे लेखन अमेरिकेतील ‘न्यू यॉर्कर’ या साप्ताहिकात क्रमश: प्रकाशित होऊ लागले आणि संपूर्ण अमेरिकेत एकच खळबळ उडाली. सामान्य वाचकांनीही या लेखांचा आधार घेत लोकप्रतिनिधींना जाब विचारायला सुरुवात केली. कीटकनाशकांच्या अतिरेकी वापराविरोधात लोक जागरूक होऊ लागले. लोकांच्या या वाढत्या प्रक्षोभाने सरकार, प्रशासन खडबडून जागे झाले. याच लेखमालिकेचे पुढे पुस्तकात रूपांतर झाले- ‘सायलेंट स्प्रिंग’! पुस्तकाची घोषणा होताच तब्बल ४० हजार वाचकांनी नोंदणी करून प्रसिद्धीपूर्व नोंदणीचा उच्चांक केला. ‘बुक ऑफ द मंथ’ योजनेअंतर्गत दीड लाख प्रतींची मागणी झाली. पुस्तकरूपाने २७ सप्टेंबर १९६२ रोजी प्रकाशित झालेल्या ‘सायलेंट स्प्रिंग’ने संपूर्ण अमेरिकेत पर्यावरणीय लोकजागृतीचा एक नवा अध्यायच लिहिला.

‘सायलेंट स्प्रिंग’चे ‘न्यू यॉर्कर’मधून क्रमश: प्रकाशन जेव्हा होत होते, त्या काळात दुसऱ्या महायुद्धातील जपानवरील अणुबॉम्ब हल्ल्याच्या आठवणी लोकांच्या मनात ताज्या होत्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात निर्माण केलेल्या रासायनिक तंत्रज्ञानाचे परिणाम संपूर्ण जग नुकतेच अनुभवू लागले होते. अशातच अमेरिकी उद्योगपतींनी सुरू केलेल्या डीडीटीच्या अतिप्रसाराविरोधात ‘सायलेंट स्प्रिंग’मधून रॅशेल यांनी जनजागृती केली. या पुस्तकानंतर दशकभराने अमेरिकेत  कीटकनाशक नियंत्रणाचा राष्ट्रीय कायदा (१९७२) अस्तित्वात आला. पुस्तक इंग्रजी भाषेत, वैज्ञानिक परिभाषेत असले तरी रॅशेल कार्सन यांच्यासारख्या कविमनाच्या संशोधिकेने ते सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले आहे, म्हणूनच ‘सायलेंट स्पिं्रग’ची वाचनीयता अखंड आहे.

– मनीष चंद्रशेखर वाघ

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org