– सुनीत पोतनीस

फ्रान्सकडून ७ ऑगस्ट १९६० रोजी  स्वातंत्र्य मिळवून अस्तित्वात आलेला ‘आयव्हरी कोस्ट’ हा आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीतला एक देश. आयव्हरी कोस्ट हा स्वातंत्र्यापूर्वी अनेक वर्षे

फ्रेंचांची वसाहत तर होताच; परंतु आजही इथल्या लोकांवर फ्रेंचांचा एवढा प्रभाव पडलेला आहे, की त्यांची राष्ट्रभाषासुद्धा फ्रेंच आहे. फ्रेंचमध्ये या देशाचे नाव आहे- ‘कोत दी-वाँ’! त्यामुळे आयव्हरी कोस्ट या नावापेक्षाही हेच नाव प्रचलित आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात आफ्रिकेत  आलेल्या पोर्तुगीज व फ्रेंच व्यापारी-संशोधकांनी आफ्रिकेच्या किनारपट्टीवरील विविध प्रदेशांमधून ज्या वस्तूंचा व्यापार होत होता ते नाव त्या प्रदेशाला दिले. आयव्हरी कोस्टच्या किनाऱ्यावरून प्रामुख्याने हस्तिदंताची निर्यात होत असे, म्हणून त्या प्रदेशाचे नाव झाले ‘कोत दी-वाँ’! त्याचे ब्रिटिशांनी ‘आयव्हरी कोस्ट’ केले. तसेच काही इतर किनारपट्टींना गोल्ड कोस्ट, स्लेव्ह कोस्ट, ग्रेन कोस्ट, पेपर कोस्ट  नावे मिळाली.

आयव्हरी कोस्टच्या पश्चिमेला लायबेरिया आणि गिनी, उत्तरेला माली आणि बुर्किना फासो, पूर्वेला घाना या देशांच्या सीमा भिडलेल्या आहेत, तर दक्षिणेला गिनीची खाडी आहे. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक वंशांचे, अनेक भाषा बोलणारे लोक असूनही ते गुण्यागोविंदाने राहत आहेत. येथील वांशिक, धार्मिक संघर्षही नगण्यच म्हणता येतील.

युरोपीयांचा इथे प्रवेश होण्यापूर्वी इथे मूळच्या स्थानिक लोकांची अनेक लहान-मोठी राज्ये होती. म्यामन, कोंग आणि बाउल ही त्यांपैकी प्रमुख. स्थानिक राज्यकत्र्यांमध्ये आपसातला संघर्ष ही नित्याचीच बाब होती. १८४३ साली या प्रदेशात प्रथम आलेल्या एका फ्रेंच नौदल अधिकाऱ्याने फ्रेंच सरकारच्या वतीने दोन स्थानिक राजांशी त्यांच्या प्रदेशाच्या संरक्षणाचा करार केला. हा करार केवळ संरक्षणविषयक न राहता प्रशासकीय सल्लागार म्हणूनही कार्यान्वित होऊन फ्रेंच अधिकाऱ्यांसमवेत आयव्हरी कोस्टमध्ये फ्रेंच व्यापारी, ख्रिस्ती मिशनरी, व्यापारी संस्था आणि सैनिक यांचाही प्रवेश झाला. हळूहळू त्यांनी आयव्हरी कोस्टच्या अंतर्गत प्रदेशात शिरून काही प्रदेशांवर ताबा मिळवला आणि फ्रेंचांनी किनारपट्टीत व्यापारी ठाणी वसवून त्यांना किल्लेवजा भक्कम तटबंदी बांधून घेतली.

sunitpotnis94@gmail.com